जलस्त्रोत आटले; लातूर जिल्ह्यातील सव्वातीनशे गावे तहानली!
By हरी मोकाशे | Published: April 8, 2024 05:56 PM2024-04-08T17:56:46+5:302024-04-08T17:58:24+5:30
टंचाईची दाहकता वाढली : दीडशे गावांना अधिग्रहणाचे पाणी
लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं. से. वर पोहोचला आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्याचबरोबर विहिरी, कुपनलिका आटू लागल्या आहेत. परिणामी, पाणीटंचाईची दाहकता अधिक वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील ३२२ गावे तहानली असून ४३६ अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी १५२ गावांना १७० अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. शिवाय, परतीचाही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या, ओढे- नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम प्रकल्पांसह विहिरीच्या पाणी पातळीत पुरेशा प्रमाणात वाढ झाली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवणार असे गृहित धरीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनात्मक आराखडे तयार करण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यात डिसेंबरपासून पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. वाढत्या उन्हाबरोबर बाष्पीभवन वाढत असल्याने पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे.
अहमदपुरातील ७९ गावांत टंचाई...
तालुका - टंचाईग्रस्त गावे
लातूर - ३८
औसा - ४६
निलंगा - ७३
रेणापूर - ३०
अहमदपूर - ७९
चाकूर - १९
शिरुर अनं. - ०५
उदगीर - २०
देवणी - ०१
जळकोट - ११
एकूण - ३२२
अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक अधिग्रहणे...जिल्ह्यातील ३२२ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ४३६ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणी करुन १९ गावांचे ३८ प्रस्ताव वगळले आहेत. २४१ गावांचे २९३ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी १२४ गावे आणि २८ वाड्यांचे असे एकूण १५२ गावांचे १७० अधिग्रहण प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात टँकरची संख्या वाढू लागली...
जिल्ह्यातील १९ गावे आणि एक वाडीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. प्रत्यक्ष पाहणीनंतर ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी १२ गावांचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करण्यात आले असता त्यातील ९ गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे.
औसा तालुक्यात सर्वाधिक टँकर...
औसा तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरु आहेत. तालुक्यातील लामजना, खरोसा, मोगरगा, टाका, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णीसही टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फुलसेवाडीस टँकर मंजूर करण्यात आले आहे. जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा/ वाघमारे तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी या गावांना टँकरची प्रतीक्षा लागून आहे.