उन्हाबरोबर पाणीटंचाई वाढली; लातूर जिल्ह्यातील ७१ गावांच्या घशाला काेरड!
By हरी मोकाशे | Published: February 8, 2024 05:56 PM2024-02-08T17:56:23+5:302024-02-08T17:57:07+5:30
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत.
लातूर : चार दिवसांपासून कमाल तापमानात अल्पशी वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हं अधिक प्रमाणात जाणवू लागले आहे. वाढत्या उन्हाबरोबर आता पाणीटंचाईही वाढत आहे. जिल्ह्यातील ७१ गावे व वाड्यांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ९२ प्रस्ताव दाखल केले आहेत. दरम्यान, तीन गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह ओढे- नाले वाहिले नाहीत. परिणामी, मध्यम व लघु प्रकल्पात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणीपातळीतही वाढ झाली नाही. यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवण्याची भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने टंचाई निवारण आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर जिल्ह्यातील जलसाठे आरक्षित करण्यात आले आहेत. अवैधरित्या पाणी उपसा करण्यात येत असल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
अहमदपूर तालुक्यास सर्वाधिक टंचाईचे चटके...
तालुका - प्रस्ताव
लातूर - १७
औसा - २४
निलंगा - १०
रेणापूर - ४
अहमदपूर - ३३
शिरुर अनं. - १
उदगीर - १
देवणी - १
जळकोट - १
एकूण - ९२
पंचायत समितीकडून तहसीलकडे प्रस्ताव...
पाणीटंचाई निवारणार्थ ६१ गाव आणि १० वाडी- तांड्यांचे एकूण ९२ प्रस्ताव ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे सादर केले आहेत. दरम्यान, पंचायत समितीने पाहणी करुन तीन प्रस्ताव वगळले. त्यातील ४० गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५८ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठविले आहेत. तहसीलदारांच्या मंजुरीनंतर तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
लातुरातील दोन गावांसाठी अधिग्रहण...
सध्या लातूर तालुक्यातील दोन गावांना आणि उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. उर्वरित प्रस्तावांना मंजुरीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. विशेष म्हणजे, चाकूर तालुक्यातील एकाही गावास अद्यापही पाणीटंचाई जाणवत नाही.
चार गावांची टँकरची मागणी...
जिल्ह्यातील लामजना (ता. औसा), टेंभूर्णी (ता. अहमदपूर), येलदरा (ता. जळकोट) आणि चिंचोली ब. (ता. लातूर) या चार गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या गावाच्या एक किमीच्या परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायतींनी प्रस्तावाद्वारे केली आहे.
तीन तालुक्यांत पाणीसमस्या अधिक...
जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील २७ गावे आणि ६ वाड्यांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्यातील १० गावे आणि चार वाड्या, लातूर तालुक्यातील १० गावांत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. निलंग्यातील ६ तर रेणापुरातील ४ गावांच्या घशाला काेरड पडली आहे.