लातूर जिल्ह्यातील १९ गावांत पाणीटंचाईच्या झळा; ग्रामस्थांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा
By Sandeep.bhalerao | Published: April 5, 2023 07:09 PM2023-04-05T19:09:03+5:302023-04-05T19:10:26+5:30
पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत
लातूर : जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाच्या चटक्यासोबतच प्रकल्प, विहिरी, विंधन विहिरीची पाणीपातळी खालावत चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील १९ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, या गावांनी पंचायत समिती स्तरावर अधिग्रहणाचे २१ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अजून एकही प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना टँकर मंजुरीची प्रतीक्षा लागली आहे.
जिल्ह्यातील १८ गावे व १ वाडी मिळून १९ गावांत पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे २१ प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर दाखल करण्यात आले आहेत. पंचायत समितीकडून तहसील कार्यालयाकडूून ८ गावे व १ वाडी असे ९ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत उपविभागीय अधिकारी यांच्याकडून एकाही प्रस्तावास मंजुरी देण्यात आलेली नाही. या कार्यालयाकडून या गावात पाणीटंचाई आहे का याची तपासणी केली जात आहे. तपासणीअंती या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या तालुक्यातून प्रस्ताव दाखल...
लातूर तालुक्यातील १ वाडी आणि औसा तालुक्यातील २ गावे, निलंगा ३, अहमदपूर १० तर जळकोट तालुक्यातील ३ अशी १८ गावे व १ वाडी मिळून १९ गावांतून २१ प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आलेले आहेत. पंचायत समितीकडून हे प्रस्ताव तहसील प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावाची चौकशी झाल्यानंतर मंजुरी देण्यात येणार आहे.
या तालुक्यात पाणीटंचाई नाही...
जिल्ह्यातील रेणापूर, चाकूर, शिरुर अनंतपाळ, उदगीर व देवणी तालुक्यात सद्यस्थितीत पाणी टंचाईचा एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही. गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस बरसला होता. त्यामुळे प्रकल्प पाण्याने ओसंडून वाहू लागले होते. नदी-नाल्यांनाही पाणी होते. विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे आतापर्यंत पाणीटंचाईची समस्या निर्माण झालेली नाही. केवळ १९ गावांत पाण्याची समस्या आहे. मात्र, यावर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.