अहमदपूरात पाण्याचे दुर्भिक्ष; ४९ गावे-वाड्या व्याकूळ, एकाच गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
By हरी मोकाशे | Published: January 24, 2024 05:35 PM2024-01-24T17:35:42+5:302024-01-24T17:36:19+5:30
पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.
लातूर : जिल्ह्यास महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या जाणवत असून आता झळा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. त्यामुळे टंचाई दूर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून उदगीर तालुक्यातील एका गावास अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपर्यंतही पर्जन्यमान झाले नाही. परिणामी, खरीपातील उत्पादनावर मोठा परिणाम झाला. त्याचबरोबर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा, तिरु या प्रमुख नद्या वाहिल्या नाहीत. तसेच नाले, ओढे खळाळले नाहीत. परिणामी, जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पात अपेक्षित जलसाठा झाला नाही. शिवाय, विहिरी, कुपनलिकांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे डिसेंबर अखेरीसपासून जिल्ह्यास पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पर्जन्यमान कमी झाल्याने यंदा लवकरच पाणीटंचाई जाणवेल, अशी भीती व्यक्त करीत जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला.
अहमदपुरात सर्वाधिक पाण्याची समस्या...
तालुका - टंचाईग्रस्त गावे
लातूर - ६
औसा - ८
निलंगा - ४
रेणापूर - ३
अहमदपूर -२५
शिरुर अनं. - १उदगीर - १
जळकोट - १
एकूण - ४९
मंजुरीसाठी तहसील कार्यालयास २६ प्रस्ताव...
जिल्ह्यातील ४१ गावे आणि ८ वाड्यांचे एकूण ५७ प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. पाहणीअंती ३ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले. दरम्यान, १७ गावे आणि ८ वाड्यांचे २६ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये अधिग्रहण...
गतवर्षी अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मार्चमध्ये निर्माण झाली होती. जिल्ह्यात मार्चपासून अधिग्रहणास सुरुवात झाली होती. मात्र, यंदा जानेवारीअखेरीपासून अधिग्रहणास सुरुवात झाली आहे. यंदाचे पहिले अधिग्रहण उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा गावासाठी करण्यात आले आहे.
दोन गावांचे टँकरचे प्रस्ताव...
जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लामजना आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी गावास तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला आहे. पंचायत समिती आणि तहसीलदारांकडून पाहणी होईल. एक किमीच्या परिघात अधिग्रहणाची सोय नसल्यास टँकर सुरु होऊ शकते, असे जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे व पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
मध्यम प्रकल्पात १७ टक्के उपयुक्त साठा...
प्रकल्प - उपयुक्त साठा
तावरजा - ००
व्हटी - ००
रेणापूर - १५.३५
तिरु - ००
देवर्जन - २४.५२
साकोळ - ३४.८०
घरणी - २३.६२
मसलगा - ४३.२८
एकूण - १७.०१
तीन मध्यम प्रकल्प जोत्याखाली...
जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प जोत्याखाली आहेत. तसेच १३४ साठवण तलावात ५७.४४१ दलघमी म्हणजे १८.२८ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.