खंडित वीजपुरवठ्याने लातूरात पाणी पुरवठा ठप्प; ४ दिवसांआड पाण्याचे वेळापत्रक कोलमडले!
By हणमंत गायकवाड | Published: May 4, 2023 05:58 PM2023-05-04T17:58:18+5:302023-05-04T17:59:49+5:30
धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही.
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पावरील वीज पुरवठ्यामध्ये वारंवार बिघाड होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. चार दिवसांआड पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. यामुळे लातूर शहरातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
गेल्या १६ एप्रिलपासून वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय होत आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. धनेगाव येथील मांजरा प्रकल्पावर पाणी उचलण्यासाठी जे पंप आहेत, त्या पंपांना सुरळीत वीजपुरवठा होत नाही. मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत सारखा बिघाड होत आहे. वाऱ्यामुळे तारा तुटत आहेत. तसेच इन्क्युबिलेटर यामुळे खराब झालेले आहे. परिणामी, पाणी उपसा करता येत नाही. यामुळे लातूर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून नियमित चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने चार दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. आता आठ दिवसांच्या वर कालावधी लागत आहे.
दररोज ६० एमएलडी पाण्याची उचल
मांजरा धरणातून लातूर शहरासाठी दररोज ५० ते ६० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण होऊन लातूर शहरातील नऊ जलकुंभांवरून वितरण होते. परंतु, वादळी वाऱ्यामुळे मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत सातत्याने बिघाड होत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे धनेगाव येथून पाणी उचलण्यास अडथळा होत आहे. मागच्या शनिवारी हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. मात्र, त्यानंतरही बिघाड झाल्याने पाणी वितरण कोलमडले आहे.
महावितरणकडून दुरुस्ती सुरू
महावितरणकडून मुरुड सबस्टेशन ते धनेगाव सबस्टेशनपर्यंत दुरुस्ती, शिवाय जे साहित्य जळाले आहे ते साहित्य बदलले जात आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. बुधवारी रात्री दुरुस्ती केल्यानंतर पाणी उचलण्यात आले होते. त्यातून शहरातील काही भागात पाणी सोडण्यात आले, असे लातूर मनपातील पाणी वितरण प्रमुख जलील शेख यांनी सांगितले.
नागरिकांनी सहकार्य करावं
वादळी वाऱ्यामुळे वीज तारा तुटत आहेत. शिवाय, वाऱ्यामुळे तारा घर्षण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. या समस्यांमुळे मांजरा धरणावरून पाणी उचलण्यासाठी अडथळा येत आहे. जशी लाईट येईल तसे पाणी उचलले जात आहे. त्यानुसार लातूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे.
- जलील शेख, पाणी वितरण प्रमुख, लातूर मनपा.