पाणीटंचाईचे चटके; अहमदपूरात २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
By संदीप शिंदे | Published: March 20, 2024 04:06 PM2024-03-20T16:06:53+5:302024-03-20T16:07:34+5:30
एक टँकर सुरु : पंचायत समितीकडे टंचाई निवारणासाठी येताहेत प्रस्ताव
अहमदपूर : तालुक्यात मार्चच्या महिन्यात पाणीटंचाईचे चटके वाढले असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी हातपंपावर पाण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामस्थांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच सर्वाधिक टंचाईच्या झळा अहमदपूर तालुक्याला सुरू झाल्या आहेत. पंचायत समितीला एकूण ५७ अधिग्रहण प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ४७ अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलला पाठविण्यात आले आहे. अधिग्रहण मंजुरी २५ आदेश प्राप्त झाले असून, त्यापैकी २५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा होत असून, एक टँकरही सुरु करण्यात आले आहे.
तालुक्यातील फुलसेवाडी येथे टँकरची मागणी करण्यात आली असून, बालाघाटच्या डोंगररांगेत वसलेल्या अहमदपूर तालुक्यात दरवर्षी पाऊस इतर तालुक्याच्या तुलनेत कमी असतो. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा उन्हाळ्यात सर्वाधिक असतात. मार्च महिन्यात ग्रामीण भागातून पाणीटंचाईची ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे टँकर व अधिग्रहणाची मागणी होत आहे. टंचाईत उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीने १६८ गावे वाड्या, तांड्यासाठी ६ कोटी ७४ लाखांचा आराखडा तयार केला आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात टंचाईच्या झळा तालुक्याला सुरु होतात. यंदा मात्र गतवर्षीच्या परतीच्या पावसामुळे महिनाभर नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता मात्र २५ ते ३० गावांत टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ३३ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. जानेवारी ते मार्चपर्यंत टंचाईवर उपयोजना करण्यासाठी १ कोटी ९७ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. एप्रिल ते जूनपर्यंत टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी १ कोटी ४३ लाखाचा आराखडा तयार करून पाठविण्यात आला होता. प्रशासन उपाययोजना करण्यासाठी कामाला लागले आहे. टंचाई सदृश्य गावात उपाययोजनांसाठी ग्रामस्थांचे पंचायत समितीला खेटे वाढले आहेत. पंचायत समितीकडे प्रस्ताव आल्यावर संबंधित गावची पाहणी करून तात्काळ उपायोजना केल्या जात असल्याचे पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या गावांमध्ये अधिग्रहणाद्वारे पाणी...
तालुक्यातील २५ गावात अधिग्रहण करण्यात आले आहे. हासरणी, काळेगांव, मुळकी,देवकरा, उणी, उमरगा कोर्ट, टाकळगाव, कामखेड, टाकळगाव, कौडगाव, मोळवण, सुनेगाव शेंद्री, वळसंगी, विजयनगर तांडा, धसवाडी, शिवाजीनगर तांडा, कोपनरवाडी, खरकाडीतांडा, अजनी वाडी दगडवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयाने अधिग्रहणाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दिला आहे. अधिग्रहणासाठी गावात स्त्रोतही शिल्लक नसल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी टेंभूर्णी या गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
आवश्यकतेनुसार टँकरने देणार पाणी...
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोलकुमार आंदेलवाड म्हणाले, अधिग्रहण व टँकरची मागणी होताच दोन दिवसांत पाहणी करुन अधिग्रहण करण्यात येत आहे. अधिग्रहणासाठी तालुक्यातून ५७ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातील २५ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. नव्याने दाखल होत असलेले प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.