पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले; निलंगा पालिकेकडे विजबिलाची पावणेचार कोटींची थकबाकी !
By संदीप शिंदे | Published: April 1, 2024 01:24 PM2024-04-01T13:24:02+5:302024-04-01T13:24:33+5:30
वारंवार वीजपुरवठा खंडित : उन्हाळ्यातील पाणीटंचाईचे नियोजन कसे होणार
निलंगा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणी असूनही केवळ पालिका प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे निलंगा शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. महावितरण कंपनीची ३ कोटी २६ लाख ८६ हजार रुपयांची थकबाकी तर ४५ लाखांची पाणीपट्टी अशी एकूण ३ कोटी ७१ लक्ष ८६ हजार रूपयांची थकबाकी आहे. त्यात महावितरण तर कधी सिंचन उपसा विभागामुळे पाणीपुरवठा बंद होतो आणि तांत्रिक बिघाड तर नेहमीच होत असतो. अशीच स्थिती राहिली तर उन्हाळ्यात पाणीपुरवठा होणार कसा असा सवाल उपस्थित होत आहे.
निलंगा शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा यासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी अथक प्रयत्नातून माकणी धरणावरून ४० किलोमीटर पाइपलाइन अंथरूण शहराला पाणीपुरवठा सुरळीत चालू केला. मात्र, २५ ते ३० वर्षांनंतर ही सर्व यंत्रणा जीर्ण झाल्यामुळे व लिकेजसचे प्रमाण वाढल्याने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी ८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ही संपूर्ण योजना करून घेतली होती. संबंधित गुत्तेदाराने ही योजना पूर्ण कार्यान्वित न करता गडबडीत पालिकेला हस्तांतरण केले. त्यामुळे यातील सर्व दोष तसेच राहिल्यामुळे वारंवार लिकेजसचा अडथळा येऊन पाणीपुरवठा ठप्प होऊ लागला आहे. परिणामी, नागरिकांना अशा कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
अशातच शहराला २४ तास पाणीपुरवठा करू असे सांगण्यात येऊन नळाला मीटर बसवण्यात आले. मात्र ते आजही नादुरुस्त अवस्थेत पडून असून, विनाकारण निधीचा चुराडा झाला आहे. सर्व शहरातील नागरिकांनी या नवीन पाईपलाईनचे डिपॉझिट भरून नळ कनेक्शन घ्यावे या हेतूने पालिका प्रशासनाने शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या योजनेत दोष तर आहेतच त्यातच महावितरण कंपनीची थकबाकी कोट्यवधी रुपये असल्याने वारंवार पाणीपुरवठ्याचा विद्युत पुरवठा बंद केल्याने पाणी वितरण बंद होते.
पालिकेने नियोजन करण्याची मागणी...
या थकबाकीत लघुदाब १७ लाख ४० हजार, उच्चदाब १ कोटी ६८ लाख ३७ हजार रुपये, नगरपरिषद दिवाबत्ती उच्चदाब १ कोटी ३९ लक्ष ९३ हजार, नगरपरिषद कार्यालय १ लाख १६ हजार अशी एकूण ३ कोटी २६ लक्ष ८६ हजार महावितरणची थकबाकी तर ४५ लाख रुपये पाणीपट्टी असे एकूण ३ कोटी ७१ लाख ८६ हजार रुपये थकबाकी आहे. याच थकबाकीमुळे कायम पाण्याचा त्रास होणार असेल तर पालिकेने याबाबत काय नियोजन केले आहे, त्यासंबंधी ठोस पावले उचलून कायमस्वरूपी बंदोबस्त करावे अशी मागणी निलंगावासीयांनी केली आहे.
शहरातील ६५ बोअरवेल सुरु करावेत...
निलंगा शहरातील पालिकेच्या मालकीचे ६५ बोअरवेल बंद करून टाकल्याने शहरातील नागरिकांना या मोठ्या यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र पाण्याची आपत्कालीन परिस्थितीत पालिकेचे सर्व बोअर पुन्हा चालू केले पाहिजे अशी मागणी येथील अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र, याबाबत प्रशासनाने कोणतीच उपाययोजना अद्याप राबविलेली नाही. उन्हाची तीव्रता पाहून उपाययोजना राबविण्याची मागणी होत आहे.