लातूरमध्ये ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टद्वारे जलपुनर्भरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 03:21 AM2019-11-17T03:21:02+5:302019-11-17T03:21:11+5:30
पाणीपातळीत वाढ होण्यासाठी अभिनव उपक्रम
- संदीप शिंदे
लातूर : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांत ४३७ ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’चा उपक्रम राबविण्यात आला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ५५ गावांत ‘रिचार्ज शाफ्ट’ उपक्रमामुळे जलपुनर्भरणास मदत
झाली आहे.
सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विंधन विहिरींची घनता जास्त असलेला भाग, भूजलाचा वाढता उपसा असलेले क्षेत्र तसेच पाणी पातळी घटलेला भाग आदी ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाने उपक्रम राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांतील ४३७ ठिकाणाची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला. परिणामी, नदी, नाले, बंधारे, लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.
एक शाफ्ट पाच वर्षे काम करणार
एक रिचार्ज शाफ्टचे काम योग्य पद्धतीने झाल्यास पाच वर्षासाठी ते काम करते. या उपाययोजनेस अत्यंत अल्पस्वरूपाच्या देखभालीची गरज असते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या नदी, बंधारे तसेच सार्वजनिक पिण्याच्या जलस्रोताजवळ शाफ्टची उभारणी करता येते. या प्रयोगामुळे जलसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. गावस्तरावर नागरिकांच्या सहकायार्मुळे रिचार्ज शाफ्टची संकल्पना भविष्यात सर्वच गावात राबविली जाणार आहे.
जलपुनर्भरणाच्या उपक्रमामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. - डॉ. भालचंद्र संगनवार,
वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग