आम्ही सारी माणसं.. आणि या सर्वांची माणुसकी; गरजूंना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:17+5:302021-04-26T04:17:17+5:30
दिशा प्रतिष्ठान वैद्यकीय मदत गरजूंना मदत, उपलब्ध बेडच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुविधा लातूर शहरातील दिशा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षभरापासून कोरोना ...
दिशा प्रतिष्ठान वैद्यकीय मदत
गरजूंना मदत, उपलब्ध बेडच्या माहितीसाठी हेल्पलाईन सुविधा
लातूर शहरातील दिशा प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या वर्षभरापासून कोरोना रुग्णांच्या सेवेचा यज्ञ अविरत सुरू आहे. शहरातील दहा कोविड केअर सेंटरच्या बाहेर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली असून, बेडच्या उपलब्धतेसाठी सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत हेल्पलाईन नंबर उपलब्ध आहेत. या सोबतच अन्नधान्य किट, लाॅकडाऊनुळे रोजगार गेलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना शैक्षणिक मदत दिशा प्रतिष्ठानच्या वतीने केली जात आहे. तसेच रुग्ण व नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.
अश्विनी डिगोळे अन्नदान
शासकीय रुग्णालय परिसरात मोफत भोजन व पाण्याची सोय
शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची भोजनाची सोय व्हावी, यासाठी अश्विनी डिगोळे, आदित्य बगाडे, प्रीती भगत यांनी दुपार आणि संध्याकाळ या वेळेत मोफत भोजन व पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण शासकीय रुग्णालयांत उपचार घेतात. संचारबंदीमुळे नातेवाईकांची भोजनासाठी परवड होऊ नये, या उद्देशाने नियमितपणे दुपार आणि संध्याकाळच्या वेळेत भोजन आणि पाणी दिले जाते.
जमाअत-ए-इस्लामी हिंद
संचारबंदीमुळे गरजूंना मोफत किराणा किटचे वाटप
जमाअत-ए-इस्लामी हिंद लातूर शाखेच्या वतीने गरजू कुटुंबांना मोफत किराणा किटचे वाटप केले जात आहे. पवित्र रमजानचा महिना सुरू असल्याने या उपक्रमाला अधिक गती दिली जात आहे. आतापर्यंत गरजू कुटुंबांना ५ ला रुपयांच्या राशन कीटचे वाटप झाले आहे. यामध्ये एसआयओ, युथ विंग या संस्थांच्या स्वयंसेवकांचा सहभाग आहे. कीटमध्ये गहू, तांदूळ, साखर, गूळ, तेल, मीठ, मिरची आदी साहित्याचा समावेश आहे. या उपक्रमामुळे अनेक गरजूंना आधार मिळाला आहे.
बाळ विश्व समर्थ प्रतिष्ठान
मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना घरपोच किराणा साहित्य वाटप
लातूर शहरातील बाळ विश्व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना घरपोच किराणा साहित्याचे वाटप केले जात आहे. मागील वर्षीच्या लाॅकडाऊनपासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे. बालाजी जाधव, रवि मुटकुळे, किसन कदम, सचिन डोंगरे, राणा चव्हाण, सचिन सोळुंके आदी या उपक्रमात सहभागी असून, गरजूंना मदत मिळत आहे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाची परवड होऊ नये, यासाठी या प्रतिष्ठानच्या वतीने ही मदत केली जात आहे.