हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:40 IST2025-01-28T13:39:34+5:302025-01-28T13:40:46+5:30
प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. संचलनात भाग घेत या विद्यार्थ्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले.

हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली
लातूर : कानावर शब्द पडले तरी ऐकता येत नाही. तरीही बॅण्ड पथकाच्या कंपाचा आधार घेत लातूरच्या मूकबधीर विद्यार्थ्यांनी रविवारी जिल्हा क्रीडा संकुलावर झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हिरीरीने सहभाग घेत संचलन करीत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. राज्यातील दिव्यांगांचा हा अनोखा उपक्रम झाला. या मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.
प्रजासत्ताकदिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी विविध तुकड्यांचे संचलन झाले. यात प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेत ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. शहरातील ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधीर विद्यालय व सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधीर विद्यालयातील ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. मुलांच्या तुकडीचे नेतृत्व प्रवीण दावलबाजे याने तर मुलींच्या तुकडीचे नेतृत्व आदिती यादव हिने केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधिक्षक सोमय मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, नागेश मापारी यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
देशात प्रथमच, लातूरात मूकबधीर विद्यार्थ्यांचे तालबध्द संचलन #laturnews#marathwadapic.twitter.com/sTN3r2fETO
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) January 28, 2025
समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम लातूर विभागात राबविण्यात येत आहे. यशस्वीतेसाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक डॉ. शंकर चामे, राजू गायकवाड, बाळासाहेब वाकडे, प्रमोद शिंदे, महेश पाळणे, प्रशांत कुलकर्णी, नंदकुमार थडकर, नामदेव भालेकर, प्रवीण कदम, रामेश्वर गवरे, सिंधू इंगळे, मीरा परजणे यांनी परिश्रम घेतले.
पालकमंत्र्यांनी केले कौतुक...
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. तसेच त्यांना दिव्यांग मुलांसोबत फोटो घेण्याचा मोहही आवरला नाही.