'आम्हाला हात लावायचा नाही, कारवाई केली तर बघून घेऊ'; पोलीस कर्मचाऱ्यास धमकी
By हरी मोकाशे | Published: January 4, 2023 04:03 PM2023-01-04T16:03:51+5:302023-01-04T16:04:13+5:30
शहरातील इंदिरानगर भागात आरोपीची पोलिसांना धमकी
उदगीर (जि. लातूर) : शहरातील इंदिरानगर भागात मटका घेत असलेल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांसोबत झोंबाझोंबी करुन हुज्जत घालत धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुध्द विविध कलमान्वये मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलिसांनी सांगितले, शहरातील इंदिरानगर भागात स्वतःच्या फायद्यासाठी आरोपी मटका घेत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मंगळवारी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेले. तेव्हा तिथे पोलिसांनी धाड टाकली असता जुगाराचे साहित्य व रोख रक्कम मिळून आली. दरम्यान, कारवाई करीत असताना आरोपी शैलेश उर्फ पप्पू बालाजी डोंगरे, बालाजी रामराव डोंगरे (दोघेही रा. इंदिरानगर), किशोर कोंडिबा धनवाले (रा. गणेशनगर) व जावेद पठाण (रा. हाळी, ता. उदगीर) यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालून झोंबाझोंबी केली.
आम्हाला हात लावायचे नाही. आमची ओळख लांबपर्यंत आहे. आमच्यावर काही कारवाई झाल्यास चांगले होणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तुम्हाला बघून घेतो, असेही आरोपी म्हणाले. याप्रकरणी वरील आरोपींविरुद्ध उदगीर शहर पोलिस ठाण्यात लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी राजेंद्र टेकाळे यांच्या फिर्यादीवरून मंगळवारी रात्री उशिरा शासकीय कामात अडथळा आणणे, धमकी देणे व मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.