गोल्डन बॉयची खुराकाअभावी होईना वेट'लिफ्ट'!, वेटलिफ्टर आकाश गौंड अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 08:09 PM2023-08-26T20:09:46+5:302023-08-26T20:10:03+5:30

स्पर्धेसाठी पौष्टिक आहाराची गरज,क्रीडा विभागाकडेही केली याचना...

Weightlifter Aakash Gound in trouble for lack of diet | गोल्डन बॉयची खुराकाअभावी होईना वेट'लिफ्ट'!, वेटलिफ्टर आकाश गौंड अडचणीत

गोल्डन बॉयची खुराकाअभावी होईना वेट'लिफ्ट'!, वेटलिफ्टर आकाश गौंड अडचणीत

googlenewsNext

महेश पाळणे


लातूर : परिस्थितीशी दोन हात करीत त्याच हातांनी वजनदार भार उचलत भीम पराक्रम करणाऱ्या लातूरच्या आकाश गौंडने अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धा, तसेच खेलो इंडिया स्पर्धेत सलग दोन सुवर्णपदके पटकावीत आकाशाएवढी झेपही घेतली. त्याचे सर्वत्र कौतुकही झाले. मात्र, सध्या खुराकासाठी पैसे नसल्याने त्याच्या वजनदार कामगिरीला यापुढे ब्रेक लागतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

मूळचा निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील आकाश श्रीनिवास गौंड याने उत्कृष्ट लिफ्टिंग व स्नॅचच्या जोरावर वेटलिफ्टिंग खेळात सुवर्णपदक पटकावीत लातूरचे नाव देशभर गाजविले. चंडीगड येथे मार्चमध्ये झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत २३४ किलो वजन उचलत त्याने सुवर्णकिमया केली. त्यानंतर वाराणसी येथे मे महिन्यात झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्येही ५५ किलो वजनगटात जोरदार प्रदर्शन करीत सुवर्णपदक पटकाविले. स्वारातीम नांदेड विद्यापीठासाठी वेटलिफ्टिंग खेळात हे पहिलेच सुवर्णपदक होते. त्यामुळे त्याचा जयजयकार झाला; परंतु ते कौतुक तोंडीच झाले आहे.

स्पर्धेसाठी पौष्टिक आहाराची गरज...
वेटलिफ्टिंग खेळात कौशल्यवाढीसाठी पौष्टिक आहार गरजेचा असतो. मात्र, आकाशची घरची परिस्थिती साधारण असून आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्यामुळे खुराकासाठी त्याला नेहमीच अडचण असते. स्पर्धेचा हंगाम जवळ आल्याने त्याला सध्या खुराक गरजेचा आहे. वेळीच मदत मिळाली तर येणाऱ्या स्पर्धेतून त्याला यापुढेही जाण्याची संधी मिळणार आहे.

क्रीडा विभागाकडेही केली याचना...

सुवर्णपदक विजेत्या आकाशने जिल्हा क्रीडा कार्यालयातही मदतीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे अद्याप समजले नाही. विद्यापीठाने बक्षीस देण्याचे ठरविले असून ते लवकर मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याची होणारी हेळसांड थांबेल. विद्यापीठ स्पर्धेसह राज्य ऑलिम्पिक स्पर्धेतही त्याने पदके पटकाविली आहेत. मात्र, पदक विजेत्या खेळाडूच्या पदरी सध्या तरी निराशाच आहे. चालू वर्षात विद्यापीठ स्पर्धेसह सिनिअर नॅशनल स्पर्धेत पदक मिळविण्याची त्याला संधी आहे. असे झाले तर त्याला भारतीय संघाच्या सराव शिबिरात संधी मिळून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही पात्रता मिळू शकते.

वेळेत मदत मिळाल्यास फायदा...
सध्या मी विद्यापीठ स्पर्धेसह संघटनेमार्फत होणाऱ्या सिनिअर गटाच्या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहे. याच काळात मला मदत मिळाली तर माझा खुराकाचा खर्च भागेल. त्यामुळे येणाऱ्या दोन्ही स्पर्धेत मला पदक पटकावणे सुलभ होईल.- आकाश गौंड, सुवर्णविजेता, वेटलिफ्टर

Web Title: Weightlifter Aakash Gound in trouble for lack of diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर