फटाक्याने भाजले तर काय कराल? डॉ. लहानेंनी सांगितला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 10:31 PM2018-11-01T22:31:11+5:302018-11-01T22:31:16+5:30
हजारो लोकांना फटाक्यांमुळे इजा; सर्वात प्रथम भाजलेला भाग पाण्याखाली धरा : डॉ. विठ्ठल लहाने
धर्मराज हल्लाळे
लातूर : दिवाळीचा सण हा आनंदाचा आणि दीपोत्सवाने साजरा करण्याचा आहे. त्यामुळे फटाकेमुक्तदिवाळी साजरी करा असे सांगत प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने म्हणाले, असुरक्षित फटाके फोडल्याने हजारो लोक दरवर्षी जखमी होतात. त्यापासून दूर राहा. मात्र दुर्घटना घडलीच तर योग्य उपचार करा. भाजलेला भाग पहिल्यांदा पाण्याखाली धरा.
फटाकेमुक्त दिवाळीचा संदेश दिला जात असला तरी अनेकजण मोठ्या उत्साहात फटाके फोडतात. हजारो दुर्घटना घडतात. त्यावर काय उपाय योजावेत, यासंदर्भात प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, फटाक्यामुळे भाजूच नये याची काळयी घ्या. त्यासाठी प्रत्यक्ष हाताने फटाक्याची वात पेटवू नका. त्यासाठी काठीचा आधार घ्या. फटाका पेटल्यानंतर दूर अंतरावर थांबा. फटाके माती, वाळू, खडी व मुरुम असलेल्या ठिकाणी फोडू नयेत. तिथे स्फोट होऊन ती खडी, मुरुम उडून चेहऱ्यावर इजा होऊ शकते. लहान मुलांसोबत तिथे मोठ्यांनी उपस्थित राहिले पाहिजे.
असुरक्षित फटाके फोडल्याने शरिराच्या कोणत्या भागाला जास्त इजा होते? या प्रश्नावर ते म्हणाले, हात व चेहऱ्याला इजा अधिक होते. अनेकांचा हात निकामी होतो. चेहºयावर खडे उडून डोळ्यात ते जातात. अनेकांना अंधत्व येण्याची शक्यता असते. अनावधानाने भाजलेच तर काय उपचार करावेत? या संदर्भात डॉ. लहाने म्हणाले, भाजलेला भाग वाहत्या पाण्याखाली धरा किंवा स्वच्छ बकेटात पाणी घेऊन त्यात ठेवावा. चेहºयावर भाजले असेल तर स्वच्छ टॉवेल थपित ओला करून तो चेहºयावर ठेवावा. ही प्रक्रिया ३० मिनिटे करावी. कारण जेव्हा भाजते, तेव्हा आपल्या चामडीतील कोलॅजन नावाचा घटक पेट घेत असतो. तसेच भाजलेल्या भागात खूप आग पडलेली असते. ती आग पूर्णपणे थांबेपर्यंत पाणी ओतण्याची व पाण्यात हात ठेवण्याची किंवा थपथपीत ओला टॉवेल भाजलेल्या भागावर ठेवण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. ज्यामुळे भाजलेली जखम खोलवर जात नाही. जखम लवकर भरली, तर डागही लवकर भरतात. अन्यथा जखम भरण्यास वेळ लागतो. डाग पडतात, व्यंग येते.
प्रथमोपचार केल्यानंतर पुढे काय करावे, याअनुषंगाने डॉ. लहाने म्हणाले, तद्नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज करावा.
अनेकजण भाजलेल्या भागावर पाणी टाकले की फोड येते म्हणतात काय करावे, या प्रश्नावर ते म्हणाले, फोड येणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. ते फोड येणे म्हणजे जखम भरण्याची योग्य प्रक्रिया असते. केवळ ते फोड फोडू नये. जर एखादा फोड मोठा झाला, त्यावरची चामडी खूप पातळ झाली, तर फोडाच्या एका बाजूने स्टराईल निडलचा वापर करून त्यातील पाणी काढावे. भाजलेला भाग उघडा ठेवू नये. त्यावर ड्रेसिंग करणे आवश्यक असते. ज्यामुळे इन्फेक्शन टळते असे सांगत डॉ. लहाने म्हणाले, भाजल्यापासून सहा तासांच्या आत पट्टी केली तर जखम लवकर भरते.
भाजलेल्या भागावर टूथपेस्ट, मेंदी, शाई, मिरची पावडर लावणे असे अघोरी प्रकार घडतात. मुळात त्यामुळे इन्फेक्शन वाढते. मिरची पावडर लावणे आणि फोड येणे याचा काहीही संबंध नाही, असे डॉ. लहाने यांनी सांगितले. फटाक्यांमुळे भाजल्याने लातूर शहरातील एकट्या लहाने हॉस्पिटलमध्ये १५० ते १६० रुग्ण येतात. प्रबोधन केल्याने फटाक्याने गंभीर भाजण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु, किरकोळ प्रकार सुरूच आहेत. ज्यामुळे दिवाळ सणाच्या उत्साहात अनेकांना त्रास सोसावा लागतो. फटाक्याचे व्रण पडतात, पण त्यावर प्रथमोपचार म्हणजेच पाणी टाकणे तर व्रण कायम राहण्याची शक्यता कमी होते. माझ्या गेल्या १८ वर्षांच्या अनुभवात लातूर शहरात प्रत्येक दिवाळ सणात ३५० ते ४०० रुग्ण भाजल्याने रुग्णालयात येतात. हे सर्व आपण टाळू शकतो आणि दिवाळी आनंदात साजरी करू शकतो, असेही डॉ. विठ्ठल लहाने यांनी सांगितले.