कुठे बंडाचे झेंडे तर कुठे नाराजीचा सूर; अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उत्साह अन् नाराजी नाट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 02:40 PM2024-10-30T14:40:20+5:302024-10-30T14:42:32+5:30
आता ४ नोव्हेंबरपूर्वी मनधरणी होणार की जिथे-तिथे लढाई रंगतदार होणार, याची उत्सुकता आहे.
लातूर : कुठे बंडाचे झेंडे तर कुठे नाराजीचा सूर उमटवीत मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी लातूर जिल्ह्यात उत्साहाबरोबरच काही ठिकाणी नाराजी नाट्यही दिसले. आता ४ नोव्हेंबरपूर्वी मनधरणी होणार की जिथे-तिथे लढाई रंगतदार होणार, याची उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीत निलंगा मतदारसंघात काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व त्यांच्या पत्नी संगीता निलंगेकर यांनी अपक्ष अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकाविले आहे. तर औसा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आ. दिनकर माने यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी शिवसेनेचेच माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर अहमदपूरमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीचे (अजित पवार) आ. बाबासाहेब पाटील अधिकृत उमेदवार आहेत. तिथेही भाजपाचे माजी आ. बब्रुवान खंदाडे, प्रवक्ते गणेश हाके यांनी अर्ज दाखल केला असून, ते महायुतीचा धर्म पाळतात की निवडणूक लढतात हे पुढच्या चार दिवसांत कळणार आहे.
उदगीरमध्ये महायुतीकडून राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे हे अधिकृत उमेदवार असून, तिथे भाजपासाठी उमेदवारी मागणारे विश्वजीत गायकवाड, दिलीप गायकवाड हे अपक्ष उभे आहेत.
बंड नाही, नाराजी...
लातूर शहर मतदारसंघात महायुतीकडून भाजपाच्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर अधिकृत उमेदवार आहेत. परंतु, भाजपाकडून उमेदवारी मागणारे अजित पाटील कव्हेकर यांनी अर्ज दाखल केला नसला तरी तिकीट न मिळाल्याने खंत व्यक्त करीत पक्षादेश आल्याशिवाय प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तसेच उमेदवारीचा दावा करणाऱ्या भाजपाच्या प्रवक्त्या प्रा. प्रेरणा होनराव याही अर्ज दाखल करताना हजर नव्हत्या.
भाजपाचे माजी खासदार काँग्रेसमध्ये
भाजपाचे माजी खा. सुधाकर शृंगारे यांनी मंगळवारी काँग्रेसच्या व्यासपीठावर येऊन भाजपावर टीकेची झोड उठवीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. एकंदर, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुठे बंडाचे झेंडे, कुठे नाराजी तर कुठे पक्षांतर असे चित्र होते.
महाविकास आघाडीविरुद्ध महायुती
अहमदपूर व उदगीर मतदारसंघात महायुतीमध्ये बंडाचे निशाण आहे. औसा तसेच निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंड झाले आहे. तर भाजपाकडून उमेदवारीचा दावा करणाऱ्यांनी लातूर शहरात प्रचारापासून तूर्त दूर राहत नाराजीचा सूर लावला आहे.