महादेवाचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला कारने उडवले, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 13:55 IST2024-08-27T13:54:55+5:302024-08-27T13:55:27+5:30
मुखेड तालुक्यातील अपघातात जळकोट तालुक्यातील दोन तरुणांचा मृत्यू

महादेवाचे दर्शन घेऊन परतताना दुचाकीला कारने उडवले, दोन तरुणांचा जागीच मृत्यू
जळकोट (जि.लातूर) : कंधार तालुक्यातील घागरदरा येथील कड्याच्या महादेवाचे दर्शन घेऊन दुचाकीवर गावाकडे परतताना गाढवेवाडी (ता.मुखेड) येथे मोटारसायकल आणि कारचा सोमवारी अपघात झाला. त्यात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. मयत जळकोट तालुक्यातील तिरुका येथील आहेत. योगेश्वर यशवंत जाधव (२०), प्रेम दत्तात्रय मसुरे-तिरुकेकर (२२, दोघेही रा.तिरुका, ता.जळकोट) असे मयत दोघांची नावे आहेत.
जळकोट तालुक्यातील तिरुका येथील योगेश्वर जाधव व प्रेम मसुरे हे दोघे श्रावण सोमवारच्या निमित्ताने कंधार तालुक्यातील घागरदरा येथील कड्याच्या महादेवाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर ते दुचाकीवरून परतत होते. दरम्यान, ते मुखेड तालुक्यातील गाढवेवाडी येथे पोहोचले असता, मुखेडहून नांदेडकडे जाणाऱ्या कार (एमएच ०४, एलएम ४५०४) ने दुचाकीस जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मयत दोघांवर तिरुका येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.