बाजार समित्यांच्या सभापती, उपसभापतिपदाची लॉटरी लागणार कोणा-कोणाला?
By हरी मोकाशे | Published: May 19, 2023 05:09 PM2023-05-19T17:09:30+5:302023-05-19T17:09:55+5:30
बाजार समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीकडे लागले लक्ष
लातूर : जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांच्या संचालकांच्या निवडीसाठी १५ दिवसांपूर्वी रंगतदार निवडणूक झाली. त्यात पाच बाजार समित्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) महाविकास आघाडीने तर पाच ठिकाणी भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. आता सभापती, उपसभापती पदांच्या निवडीकडे लक्ष लागले असून, या पदांची लॉटरी कोणा- कोणाला लागणार याची उत्सुकता वाढली आहे.
जिल्ह्यात एकूण ११ बाजार समित्या आहेत. त्यापैकी शिरूर अनंतपाळ बाजार समितीची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवत असल्याने तेथील बाजार समितीची निवडणूक झाली नाही. उर्वरित दहा बाजार समित्यांसाठी एप्रिलच्या अखेरीस दोन टप्प्यांत निवडणूक झाली. यंदाही ही निवडणूक बहुतांश ठिकाणी दुरंगी झाल्याने लक्षवेधी आणि चुरशीची झाली. लातूर उच्चतम बाजार समितीवर काँग्रेसने आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.
या निवडणुकीनंतर सभापती, उपसभापती पदांच्या निवडी कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. दरम्यान, बाजार समितीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. २२ ते २५ मे या कालावधीत या निवडी होणार आहेत.
लातुरात २३ रोजी होणार निवड...
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापतीची दि. २३ मे रोजी निवड होणार आहे. तसेच याच दिवशी उदगीर, अहमदपूर, २२ रोजी औसा, जळकोट, २४ रोजी चाकूर आणि रेणापूर तर २५ रोजी औराद शहाजानी, निलंगा, देवणी येथील बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. सभापती, उपसभापती पदाची संधी ही शेतकरी गटातून विजयी झालेल्यांना दिली जाते.
उपसभापती पदासाठी फिल्डिंग...
बाजार समिती निवडणुकीसाठी पॅनल तयार करताना राजकीय पक्षाच्या प्रमुखांकडून सभापतिपदाचा संभाव्य उमेदवार निश्चित केला जातो, हे त्या पॅनलमधील उमेदवार जाणून असतात. त्यामुळे उपसभापतिपद मिळविण्यासाठी विजयी पॅनलमधील इच्छुकांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. तसेच ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून पॅनलप्रमुखांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.
बाजार समित्यांचे पक्षीय बलाबल...
लातूर-काँग्रेस
रेणापूर-काँग्रेस
अहमदपूर-महाविकास आघाडी
उदगीर-महाविकास आघाडी
जळकोट-महाविकास आघाडी
निलंगा-भाजप
औराद शहाजानी-भाजप
देवणी-भाजप
औसा-भाजप
चाकूर-भाजप-शिवसेना (शिंदे गट).
गेल्या वर्षीचे आर्थिक उत्पन्न...
लातूर-२६ कोटी १२ लाख
औसा-३ कोटी ४२ लाख
निलंगा-१७ लाख २६ हजार
उदगीर-५ कोटी ७० लाख
अहमदपूर-८८ लाख ८० हजार
रेणापूर-१४ लाख ८६ हजार
देवणी-१२ लाख ८५ हजार
जळकोट-१९ लाख ९८ हजार
औराद शहाजानी-७६ लाख १४ हजार
चाकूर-४९ लाख २१ हजार.