मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडून घेतली? साडेतीन तास शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा
By राजकुमार जोंधळे | Updated: April 6, 2025 19:38 IST2025-04-06T19:37:13+5:302025-04-06T19:38:42+5:30
अगदी पंधरा ते वीस मिनिटांत आयुक्तांना जखमी अवस्थेत सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मनपा आयुक्तांनी स्वत:वर गोळी का झाडून घेतली? साडेतीन तास शस्त्रक्रिया; प्रकृतीत सुधारणा
राजकुमार जाेंधळे,लातूर : महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वत:वर बंदुकीने गोळी का झाडून घेतली, याचे कारण अद्यापि पोलिस दप्तरी नोंदविलेले नाही. पोलिस कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, रविवारी पहाटे ०५:३० वाजेपर्यंत आयुक्तांवर साडेतीन तास शस्त्रक्रिया चालली. सध्या प्रकृतीत सुधारणा असून, ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आयुक्त मनोहरे यांनी शनिवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास बार्शी रोडजवळील शासकीय निवासस्थानी स्वत:च्या डोक्यात बंदुकीने गोळी झाडली होती. उजव्या कानशिलाच्या बाजूने गोळी डाव्या दिशेने आरपार गेली. घटनेच्या वेळी पत्नी, दोन लहान मुले, सुरक्षा रक्षक घरात होते. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक, कुटुंबीयांनी धाव घेतली. आयुक्तांच्या पत्नीने वसमत येथे सासऱ्यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ चालक हकानी शेख यांना फोन करून घरी जाण्यास सांगितले. अगदी पंधरा ते वीस मिनिटांत आयुक्तांना जखमी अवस्थेत सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले.
खोलीचा दरवाजा बंद, आधी नेमके काय घडले?
गोळी झाडल्याचा आवाज आल्यानंतर पत्नी, सुरक्षा रक्षक खोलीच्या दिशेने धावले; परंतु दरवाजा बंद होता. तो तोडून जखमी आयुक्त मनोहरे यांना रुग्णालयाकडे नेण्यात आले. मात्र, त्याआधी नेमके काय घडले? ज्यामुळे आयुक्तांनी टोकाचे पाऊल उचलले, याचा उलगडा झालेला नाही.
अधिकाऱ्यांना धक्का, कारण कळेना?
शनिवारी सुटी असल्याने आयुक्त मनोहरे घरीच होते. शुक्रवारी मात्र ते महापालिकेत आले होते. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतलेल्या बैठकीस ते उपस्थित होते. मितभाषी व मोजका संवाद साधून काम करणारे मनोहरे यांनी स्वत:वर गोळी झाडली, हे कळल्यानंतर मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. कामाची हातोटी, कायद्याचे ज्ञान असलेले ते अधिकारी आहेत. त्यामुळे कामाचा तणाव किंवा कार्यालयीन कुठलेही कारण नसावे, अशी चर्चा त्यांच्यात सुरू होती.
कुटुंबीयांच्या लेखी जबाबानंतरच कारण स्पष्ट...
घटनेच्या आधी काय घडले, याबद्दलची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे; परंतु जोपर्यंत कुटुंबीय लेखी जबाब देत नाहीत, तोपर्यंत कारणमीमांसा अधिकृतपणे स्पष्ट करता येणार नाही, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनीही कुटुंबीयांशी बोलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. सध्या आयुक्तांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याला प्राधान्य आहे.