जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस; एकाच दिवशी ४७ मि.मी. नोंद, चार गावांचा संपर्क तुटला
By संदीप शिंदे | Published: July 25, 2024 05:08 PM2024-07-25T17:08:56+5:302024-07-25T17:09:21+5:30
जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जळकोट : तालुक्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची हजेरी असून, शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. तर साठवण तलावातील मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. दरम्यान, गुरुवारी नदी नाल्यांना पूर आला असून, ढोरसांगवी- धनगरवाडी- ढोरसांगवी- जळकोटकडे जाणाऱ्या पुलावरुन काहीकाळ पाणी वाहिले. परिणामी, चार गावांचा संपर्क तुटला होता. पावसाचा ओघ कमी झाल्यावर वाहतूक पूर्वपदावर आली.
जळकोट तालुक्यात नदी, नाले, कालवे ओसंडून वाहत असून, एकाच दिवशी जळकोट मंडळात ४७ तर घोणसी मंडळात ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत ४३२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद तहसील प्रशासनाकडे आहे. बुधवारी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला. तर गुरुवारी मध्यरात्री पावसाचा जोर वाढल्याने नदी, नाल्यांना पाणी आले आहे. तालुक्यातील सोनवळा करंजी, रावणकोळा, माळहिपरगा, ढोरसांगवी, गुत्ती क्रमांक एक, क्रमांक दोन, जंगमवाडी, हळद वाढवणा, अतनूर, गव्हाण, मरसांगवी आदी साठवण तलावात ७० टक्के जलसाठा झाला असून आणखीन मोठा पाऊस झाल्यास हे सर्व तलाव शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो होतील. परिणामी, भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी याचा निश्चित फायदा होणार आहे. तालुक्यात जुलैअखेरपर्यंत पावसाने ५० टक्के सरासरी गाठली आहे. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, पशूधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
सूर्यदर्शन नसल्याने पिकांना धोका...
जळकोट तालुक्यात खरीपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. जवळपास १५ ते २० दिवसानंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे साठवण तलावात येवा वाढला असला तरी तीन दिवसांपासून सुर्यदर्शन नसल्याने पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा असून, त्यापाठोपाठ कापूस आणि तुरीचा पेरा आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी...
जळकोट तालुक्यात सर्वदूर पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांची मदार असून तालुका एक हंगामी खरिपाचा तालुका आहे. दरम्यान, पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नुकसानग्रस्त भागाची तहसील प्रशासन, कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशीही मागणी करण्यात येत आहे.
पावसाळ्यात तिरू नदीवर पुलाचे काम...
तालुक्यातील तिरू नदीवर अतनूरनजीक नवीन पुलाचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले. त्यामुळे पर्यायी पूल उभारण्यात आला. मात्र, सोमवारी झालेल्या पावसामुळे पर्यायी पूल वाहून गेला असून, नवीन पूल उभारणीपर्यंत अतनूरसह विविध गावांचा रस्ता मार्गाने असलेला संपर्क खंडित राहणार आहे. ऐन पावसाळ्यात जुना पूल तोडून वाहतुकीचा खोळंबा केल्याबद्दल नागरिकांतून ठेकेदाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.