पाणवठ्यामुळे वन्यजिवांची भागतेय तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:44+5:302021-04-26T04:17:44+5:30
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सिंचनाचे प्रमाण अधिक असल्याने वन्यजिवांना चारा-पाण्याची सोय हाेते. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांची काही प्रमाणात संख्या आहे. ...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात सिंचनाचे प्रमाण अधिक असल्याने वन्यजिवांना चारा-पाण्याची सोय हाेते. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांची काही प्रमाणात संख्या आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नाले, तलाव आटू लागले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अन्न - पाण्याच्या शोधात सैरावैरा धावत आहेत. काही वेळेस मानवी वस्तीकडेही धाव घेत आहेत. काही वेळेस वन्यप्राण्यांवर श्वान झडप मारत आहेत. हे लक्षात घेऊन वन विभागाचे शिरूर अनंतपाळचे वनरक्षक एस. बी. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी काही ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी टाकण्यात येत आहे. त्यामुळे हरीण, ससा, कोल्हा यासह सरपटणाऱ्या प्राण्यांची पाण्याची सोय झाली आहे.
टँकरद्वारे पाणी...
उन्हाचा पारा वाढल्यामुळे नाले, तलाव कोरडे पडत आहेत. थेरगाव, कांबळगा, डोंगरगाव, कळमगाव येथील वन परिक्षेत्रात तयार केलेल्या पाणवठ्यांत टँकरच्या माध्यमातून पाणी टाकले जात आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, असे वनरक्षक एस. बी. शिंदे यांनी सांगितले.