वाहतूक नियंत्रण उपाययोजना समिती रस्त्यांसोबतच अंतर्गत पार्किंग धोरण ठरविणार का?

By हणमंत गायकवाड | Published: July 13, 2023 07:59 PM2023-07-13T19:59:00+5:302023-07-13T19:59:54+5:30

मनपा हद्दीतील नगरांमध्ये अनेकांच्या वाहनांची रस्त्यांवर पार्किंग

Will the Traffic Control Measures Committee decide the internal parking policy? | वाहतूक नियंत्रण उपाययोजना समिती रस्त्यांसोबतच अंतर्गत पार्किंग धोरण ठरविणार का?

वाहतूक नियंत्रण उपाययोजना समिती रस्त्यांसोबतच अंतर्गत पार्किंग धोरण ठरविणार का?

googlenewsNext

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यांवरील पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी खासगी संस्थेमार्फत टोईंग व्हॅनची नजर आहे. मात्र नगरातील अंतर्गत रस्त्यांवर अनेक वाहने पार्क केल्यामुळे नगरांतून वाहनधारकांना बाहेर पडणे मुश्किलीचे जात आहे. यावर वाहतूक नियंत्रण उपाययोजना समिती पार्किंग धोरण ठरविणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील पार्किंगला शिस्त लावण्यासाठी जसे धोरण ठरविले, तसे नगरांतील अंतर्गत पार्किंग व्यवस्थेवर धोरण नसल्यामुळे अनेक वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने शहरातील पूर्व आणि पश्चिम भागामध्ये एका खासगी संस्थेमार्फत पार्किंगला शिस्त लावण्यासाठी धोरण केलेले आहे. गांधी चौकापासून वरच्या पश्चिम भागासाठी १ लाख ४३ हजार आणि गांधी चौकापासून गंजगोलाईकडे खालचा पूर्वभाग २ लाख ४९ हजार रुपये बोलीवर पार्किंग नियंत्रणासाठी देण्यात आला आहे. ३ डिसेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२४ पर्यंत या संस्थेकडे पार्किंग व्यवस्थेची देखरेख राहणार आहे. या पद्धतीने किंवा समिती ठरविल तसे नगरांतील अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या पार्किंगवर आळा बसेल का, असा प्रश्न आहे.

नो-पार्किंग अन् मार्किंगचे उल्लंघन
नो-पार्किंग झोनमध्ये वाहन लावल्यास तसेच रस्त्यावर मार्किंग केलेल्या ठिकाणाचे उल्लंघन करून वाहन पार्किंग केल्यास संबंधित वाहनधारकांकडून दंड वसूल केला जातो. गेल्या १३ डिसेंबर २०२२ पासून हे धोरण आखण्यात आले आहे. संस्थेकडून शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागासाठी कंत्राट दिले आहे. त्या कंत्राटाची रक्कम मनपाकडे संबंधित संस्थेकडून घेतली जाते. दंडाची वसुली संबंधित संस्थेला मिळते, असे मनपाच्या परिवहन विभागातून सांगण्यात आले.

सम-विषम रस्त्यावर पार्किंग...
बाजारपेठेमध्ये वाहतूक व्यवस्था बिघडू नये म्हणून सम-विषम पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. जर सोमवारी उजव्या बाजूला वाहने पार्किंग केली असतील तर मंगळवारी डाव्या बाजूला वाहने पार्किंग करण्याचा फलक लावला जातो. गंजगोलाई परिसरात ही व्यवस्था सुरू करण्यात येत आहे. सराफा लाईन, भुसार लाईन, कापड लाईन, भांडी गल्ली आदी सर्व बाजारपेठेच्या लाईनमध्ये ही व्यवस्था कार्यान्वित केली जात आहे.

मनपाचे केवळ पाच ठिकाणी वाहनतळ...
लातूर शहरामध्ये केवळ पाच ठिकाणी वाहन तळ आहेत. गांधी मार्केट, रेल्वे स्टेशन परिसर, गूळ मार्केट, अण्णा भाऊ साठे चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाण पुलाच्या खाली वाहनतळ आहे. शिवाय, रस्त्यावरही मार्किंग करून वाहने लावण्याची सोय केली जात आहे.

उल्लंघन केल्यास असा आहे दंड...
अवजड वाहन २०० रुपये
चारचाकी वाहन १०० रुपये
तीनचाकी वाहन ५० रुपये
दुचाकी ५० रुपये

Web Title: Will the Traffic Control Measures Committee decide the internal parking policy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.