बाबासारखे पोलीस, डॉक्टर होणार का; मुलांनी भरला होकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:19 AM2021-05-19T04:19:31+5:302021-05-19T04:19:31+5:30
लातूर : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट जिल्ह्यात गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून ठाण मांडून आहे. यादरम्यानच्या काळात विशेषत: कोरोनायोद्धे म्हणून ...
लातूर : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट जिल्ह्यात गेल्या वर्षभरापेक्षा अधिक काळापासून ठाण मांडून आहे. यादरम्यानच्या काळात विशेषत: कोरोनायोद्धे म्हणून कार्यरत असलेले पोलीस आणि डाॅक्टरांना अहोरात्र काम करावे लागत आहे. सततच्या कामाने कुटुंबालाही वेळ देता येणे त्यांना अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाबासारखे पोलीस, डाॅक्टर होणार का, असा प्रश्न त्यांच्या मुलांना केला असता, मुलांनी होकार भरला. कोरोनाच्या संकटकाळात जनतेची सेवा करण्यासाठी झटत असलेल्या बाबांचा अभिमान असल्याचे मुलांनी सांगितले. यासह भविष्यात बाबांसारखे पोलीस व डाॅक्टरच होणार, असा निर्धारही बोलून दाखविला. लोकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणाऱ्या डाॅक्टरांना ईश्वराचे रुप मानले जाते. कोरोनाच्या संकटकाळात त्याची अनेकांना प्रचिती येत आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत दवाखान्यात हजर राहून रुग्णांची सेवा करणाऱ्या डाॅक्टरांना कुटुंबास, मुलांना पुरेसा वेळ देता येणे सध्यातरी अशक्य झाले आहे. तशीच परिस्थिती पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची असून कोरोनाची साखळी तोडण्याकरिता अवलंबिण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पाडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामांचे तासही वाढवून देण्यात आले आहेत. यामुळे संबंधितांना कुटुंबापासून अधिकांशवेळ दुर राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात तुम्हीही पोलीस, डाॅक्टरच होणार का, असा सवाल त्यांच्या मुलांना केला असता, वडील जनसेवेत रात्रंदिवस काम करत असल्याने आम्हीसुद्धा डॉक्टर व पोलीसच होऊन लोकांची सेवा करू, इशी इच्छा मुलांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी - ३५००
जिल्ह्यातील डॉक्टर्स - ४५०
पोलीस कर्मचारी - १९४४
पोलीस अधिकारी - १०९
पोलीस व्हायला आवडेल...
माझ्या वडिलांचा मला अभिमान आहे. जनतेची सेवा करण्यासाठीच ते पोलीस झाले, हे त्यांनी मला वेळोवेळी सांगितले आहे. त्यामुळे ते मला पुरेसा वेळ देत नाहीत, याबाबत माझी कुठलीच तक्रार नाही. ते लोकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. मी देखील भविष्यात पोलीस दलात मोठा अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले आहे. - सनाबी शेख
माझी वडील पोलीस असल्याने त्यांना कर्तव्य पार पाडण्याकरिता नेहमीच घराबाहेर राहावे लागते. कोरोनाच्या काळातही ड्युटीसोबतच ते संपुर्ण कूटूंबाची काळजी घेत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मोठे झाल्यावर मी बाबासारखाच पोलीस अधिकारी होणार आहे. - आदित्य पाटील
माझे वडिल पोलिसांत असून ते सदैव जनतेच्या रक्षणासाठी तत्पर असतात. कामाच्या धावपळीत मला त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही म्हणून काय झाले? आधी कर्तव्य; नंतर कुटुंब, ही त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे. मी सुद्धा भविष्यात पोलिसच होणार आहे. - वेदांत जाधव
आम्ही डॉक्टर होणार...
कोरोना असेल तरी डाॅक्टरच होणार माझे आई-वडील डॉक्टर आहेत. गेल्या वर्षभरापासून ते रुग्णांची सेवा बजावत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांचे कामही वाढले आहे. पण त्यांच्या चेहऱ्यावर कामाचा ताण कधी दिसत नाही. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मला भविष्यात डाॅक्टरच व्हायचे आहे. - रियान उल हक
संसर्गाच्या संकटामुळे सर्वच ठिकाणी हाहा:कार उडाला आहे. अशा स्थितीत रुग्ण डाॅक्टरांकडे नाही तर कुठे जाणार? माझे बाबा डाॅक्टर असून या काळात त्यांच्या कामाचे तास वाढले आहेत. ते सतत रुग्णांची इमानेइतबारे सेवा करित आहेत. मी पण भविष्यात डाॅक्टरच होणार. - शुभम आणि शिवानी दरक
कोरोनामुळे रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मला अधिक वेळ दवाखान्यात राहावे लागणार असल्याचे बाबांनी सांगितले आहे. घरी आल्यानंतर मात्र ते माझ्यासोबत खेळतात, मला भरपूर वेळ देतात. लोकांची सेवा केल्याने देव भरभरून देतो, असे त्यांचे म्हणणे आहे. मी पण भविष्यात त्यांच्यासारखा डाॅक्टरच होणार आहे. - आयुषा पवार
सध्याच्या कोरोना संसर्गाच्या काळात कोरोना योद्ध्यांना अतिरिक्त सेवा बजावावी लागत आहे. या काळात मुले आणि आई-वडील यांच्या मधील संवाद महत्वाचा आहे. प्रत्येकांने मुलांसाठी वेळ देणे आवश्यक आहे. मुलांच्या आवडी-निवडी, छंद याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकाने विचार करायला हवा.- डॉ. मिलिंद पोतदार, मानसोपचार तज्ज्ञ लातूर