लातूर, उदगीरला बालेवाडीसारखे स्टेडियम उभारण्याचा प्रयत्न करणार -संजय बनसोडे
By हरी मोकाशे | Published: July 15, 2023 08:28 PM2023-07-15T20:28:51+5:302023-07-15T20:31:00+5:30
जिल्हा क्रीडा संकुलात कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांची जयंती कबड्डी दिन म्हणून साजरी करण्यात आली.
लातूर : जिल्ह्यात अधिकाधिक उत्कृष्ट खेळाडू निर्माण होण्यासाठी बालेवाडीसारख्या स्टेडियमची लातूरसह उदगीरला उभारणी करण्याकरिता प्रयत्नशील राहणार आहे. राज्यात क्रीडाविषयक जनजागृती करून क्रीडा संस्कृती रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी शनिवारी केले.
जिल्हा क्रीडा संकुलात कबड्डी महर्षी शंकरराव तथा बुवा साळवी यांची जयंती कबड्डी दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी जगन्नाथ लकडे, जीवनगौरव पुरस्कार विजेते प्रा. गणपतराव माने, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दयानंद सारोळे, राष्ट्रीय कबड्डी पंच लक्ष्मण बेल्लाळे, छत्रपती पुरस्कार विजेते रणजित चामले, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, क्रीडा मार्गदर्शक चंद्रकांत लोदगेकर, मकरंद सावे, ॲड. व्यंकट बेंद्रे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री बनसोडे म्हणाले, लातूरला यापूर्वी दिलीपराव देशमुख यांच्या रूपाने पहिला, तर दुसऱ्यांदा क्रीडामंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली आहे. क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांनी वेळोवेळी नावीन्यपूर्ण सूचना कराव्यात. त्यांच्या योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे खेळ आणि खेळाडू यांच्या कामगिरीत सुधारणा होईल. खेळाला वैभव प्राप्त करून देण्यासाठी देशातील उत्तमोत्तम क्रीडा संकुलाची पाहणी करून राज्यातही सर्व सोयींनीयुक्त क्रीडा संकुले उभी करणे, सध्याच्या क्रीडा संकुलात खेळाडूंसाठी सुविधा निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.
मंत्रिपद घोषित झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम...
मलाही खेळाची आवड आहे. लहानपणी ज्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळलो, त्याच क्रीडा संकुलात राज्याचा क्रीडामंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर पहिलाच कार्यक्रम होत आहे. हा योग असल्याने याचा मनस्वी आनंद झाला, असेही मंत्री संजय बनसोडे म्हणाले.