बस प्रवासामध्ये दागिने चाेरणाऱ्या महिलेला अटक
By राजकुमार जोंधळे | Updated: December 23, 2024 21:24 IST2024-12-23T21:23:52+5:302024-12-23T21:24:15+5:30
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त.

बस प्रवासामध्ये दागिने चाेरणाऱ्या महिलेला अटक
राजकुमार जाेंधळे / लातूर : बस प्रवासात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून २ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक चाैकशीत सात गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात महिलांचे दागिने, गंठण हिसकावणाऱ्या, चाेरी करणाऱ्या टाेळीचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पाेनि. संजीवन मिरकले यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात आली. शिवाय, खबऱ्यांकडून माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. साेमवारी मिळालेल्या माहितीवरून बस प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील चोरलेल्या सोन्याचे दागिने विक्री करणाऱ्या महिला आरोपीला लातुरातील साईरोड परिसरातून ताब्यात घेत घेतले. चाैकशी केली असता, लातूरसह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानकात बसमध्ये चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरल्याचे तीने कबुली दिली.
अहमदपूर हद्दीत तीन मंगळसूत्र चोरीचे गुन्हे, गांधी चाैक ठाण्याच्या हद्दीत दाेन गुन्हे, मुरूड आणि शिवाजीनगर ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. ताब्यातील महिलेकडून २ लाख ५९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. संजीवन मिरकले, पाेउपनि. संजय भोसले, सूर्यकांत कलमे, योगेश गायकवाड, तुळशीराम बरुरे, चिखलीकर, चालक केंद्रे यांच्या पथकाने केली.