विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या; सहा जणांवर गुन्हा, आराेपींना तीन दिवसांची पाेलिस काेठडी
By राजकुमार जोंधळे | Published: June 8, 2024 09:09 PM2024-06-08T21:09:27+5:302024-06-08T21:09:31+5:30
पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली असून, त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. तपास पाेउपनि. अनिल कांबळे करीत आहेत.
लातूर : तक्रार देण्यासाठी ठाण्यात गेलेल्या महिलेला तक्रार न घेता अवमानकारक वागणूक दिली. यातून महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पाेलिस काेठडी मिळाली आहे.
पाेलिसांनी सांगितले, अनिता बालाजी लष्करे (वय ३० रा. विठ्ठल नगर, वैशालीनगर, लातूर) यांच्यासह पतीला सहा जणांनी जीवे मारण्याची धमकी दिली हाेती. याबाबतची तक्रार त्या विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात देण्यासाठी गेल्या असता, तेथील पाेलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना अवमानकारक वागणूक देत, तक्रार न घेता हाकलून दिले. हा अवमान सहन न झाल्याने अनिता लष्करे यांनी बाभळगाव राेड, वैशालीनगर परिसरातील एका विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात मृत अनिताचे वडील तुकाराम चिमा इटकर (वय ५०, रा. सिकंदरपूर, ता. लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन सुभाष गंगाराम लष्करे, बाळू गंगाराम लष्करे, रावसाहेब गंगाराम लष्करे, राजू गंगाराम लष्करे, सुरेश मारोती लष्करे, राहुल बाळू लष्करे (सर्व रा. विठ्ठल नगर, लातूर) यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी सर्व आराेपींना अटक केली असून, त्यांना साेमवारपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली आहे. तपास पाेउपनि. अनिल कांबळे करीत आहेत.
दाेषी पाेलिस कर्मचारी निलंबित...
विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात मृत महिला अनिता लष्करे आल्या हाेत्या. दरम्यान, कर्तव्यावर हजर असलेल्या पाेलिस कर्मचाऱ्याने कर्तव्यात कसूर केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणात पाेलिस कर्मचारी रतन शेख यास निलंबित करण्यात आले आहे. - साेमय मुंडे, पाेलिस अधीक्षक, लातूर