तुरीचे सरासरीपेक्षा चारपट अधिक उत्पन्न घेणाऱ्या महिला शेतकरी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2023 06:01 PM2023-05-10T18:01:45+5:302023-05-10T18:02:34+5:30
उदगीर तालुक्यातील राज्यस्तरीय तूर पीक स्पर्धेत रावणगावच्या जयश्री डोणगापुरे प्रथम
उदगीर: राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप तूर पिकाच्या स्पर्धेत रावणगाव (ता. उदगीर)येथील जयश्री भीमराव डोणगापुरे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
राज्यात कृषी विभागाने गेल्यावर्षी खरीप हंगामात पीक स्पर्धा राबवली होती. या स्पर्धेत मराठवाड्यातील महिला शेतकरी जयश्री भीमराव डोणगापुरे (रावणगाव ता. उदगीर)यांनी तूर पिकात राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या चार पट अधिक उत्पादन मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समितीने हा निकाल जाहीर केला आहे.
खरिपाच्या पीक स्पर्धेत एकमेव या महिला शेतकरी जयश्री डोणगापुरे पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या आहेत.५० हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, देवर्जनचे मंडळ कृषी अधिकारी सुनील देवनाळे, कृषी सहाय्यक व्यंकट वाघमारे, नरसिंग बुगडे यांचे जयश्री डोणगापुरे यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी तूर जात राजेश्वरी बियाणांची लागवड अंतर ९फुटावर ,दोन ओळी दोन रोपांतील अंतर १०इंचाच्या बेडवर टोकण पध्दतीने केली होती.