आरक्षणाच्या मागणीसाठी महिलांचे शोले स्टाइल आंदोलन; लातूरात पाण्याच्या टाकीवर बसल्या महिला
By आशपाक पठाण | Published: October 29, 2023 11:11 PM2023-10-29T23:11:12+5:302023-10-29T23:11:26+5:30
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही.
लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात पाण्याच्या टाकीवर चढून बसलेल्या महिलांनी शोले स्टाइल आंदोलन सुरू केले आहे. रात्री ११ वाजेपर्यंतही महिला मागण्यांवर ठाम असून पोलिस प्रशासनाने विनंती करूनही त्यांनी माघार घेतली नाही.
मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने दिलेली डेडलाइन पाळली नाही. त्यामुळे अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर विविध आंदोलने केली जात आहेत. रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास काही महिलांनी गांधी चौकातील पाण्याच्या टाकीवर जवळपास ५० ते ६० फूट उंचीवर चढून आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी सुरू केली.
दरम्यान, महिला टाकीवर चढून आंदोलन करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत या आंदोलनामध्ये स्वाती जाधव, स्वयंप्रभा पाटील, रंजना चव्हाण यांच्यासह ८ महिला महिला सहभागी झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत सहा महिला टाकीवर बसून होत्या. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशा घोषणा त्यांनी दिल्या.
मराठा आरक्षणासाठी राज्य शासन वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप आंदोलनकर्ते स्वाती जाधव, स्वयंप्रभा पाटील यांनी केला. राज्य शासनाने तत्काळ आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी ॲड. उदय गवारे यांनी केली. यावेळी गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.