जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या अडीच हजार मजुरांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:16 AM2020-12-23T04:16:58+5:302020-12-23T04:16:58+5:30
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ४० हजार ४५१ कुटुंबातील ६ लाख १ हजार ...
जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २ लाख ४० हजार ४५१ कुटुंबातील ६ लाख १ हजार २४२ मजुरांची नोंदणी आहे. लाॅकडाऊन काळात पुणे, मुंबईसारख्या ठिकाणावरून अनेकांचे स्थलांतर झाले. त्यामुळे त्यांना रोहयोच्या कामात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या होत्या. मात्र आता कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याने अनेकजण आपल्या मूळ रोजगाराच्या ठिकाणी परतले आहेत. त्यामुळे रोहयोच्या कामावरील मजुरांची संख्याही घटत चालली आहे.
जिल्ह्यात सध्या ३५६ कामे सुरू असून, २ हजार ४८४ मजूर कार्यरत आहेत. यामध्ये अहमदपूर तालुक्यात ५४३, औसा २६८, चाकूर ३३२, देवणी २७, जळकोट १२६, लातूर ३७७, निलंगा २२५, रेणापूर १४२, शिरूर अनंतपाळ २८४ तर उदगीर तालुक्यातील १६० मजुरांचा समावेश आहे. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये अधिक कामे सुरू होती. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेकांचे स्थलांतर झाले. परिणामी, रोहयोच्या कामांना मागणी घटली असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
लाॅकडाऊनमध्ये वाढली होती कामे
कोरोनाच्या संकटामुळे पुकारण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांचे आपल्या मूळगावी स्थलांतर झाले. त्यातील काही जणांनी रोहयोच्या कामांना पसंती दिली. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये कामांची संख्या वाढली होती. मात्र सध्या रबी हंगाम सुरू असून, शेतीची कामे सुरू आहेत. मुबलक पाणी असल्याने सिंचन क्षेत्रही वाढले असल्याने अनेकांनी रोहयोऐवजी शेती कामांना पसंती दिली आहे. त्यामुळे मागणी घटली आहे.
ग्रामीण भागात हाताला काम मिळावे, यासाठी रोजगार हमी योजना राबविली जाते. जिल्ह्यात सध्या ३५६ कामांवर २४०० मजूर कार्यरत आहेत. लाॅकडाऊन काळात अनेकांना रोजगाराच्या संधी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून उपलब्ध झाल्या.
- आशिष पावले, रोहयो कर्मचारी
अडीच लाख कुटुंबांची नोंदणी
n रोहयो विभागाकडे २ लाख ४० हजार ४५१ कुटुंबातील ६ लाख १ हजार २४२ मजुरांची नोंदणी आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील ७७ हजार ८३८, औसा ८१ हजार ७५७, चाकूर ५३ हजार ७३६, देवणी ४० हजार १२१, जळकोट ३४ हजार ९६०, लातूर ७२ हजार २४, निलंगा ८५ हजार ६३३, रेणापूर ४२ हजार ६४३, शिरूर अनंतपाळ ३० हजार ४०५ तर उदगीर तालुक्यातील ८२ हजार ११५ मजुरांचा समावेश असल्याचे रोहयो विभागाने सांगितले.