विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू; हाॅटेल चालकावर लातुरात गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Published: April 17, 2023 07:17 PM2023-04-17T19:17:07+5:302023-04-17T19:21:27+5:30
पाण्याच्या हाैदात असलेली इलेक्ट्रिक माेटर आणि वायर असुरक्षित असताना देखील काम करण्यास लावले
लातूर : हाॅटेलमधील हाैदावर पाण्याची माेटार लावत असताना हाैदावरील पत्र्यात विद्युतप्रवाह उतरल्याने बसलेल्या विजेच्या धक्क्यात एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना लातुरातील औसा राेडवरील मराठवाडा लंच हाेम येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात हाॅटेल चालकाविराेधात साेमवारी पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, फिर्यादी साेमनाथ शंकर पुरी (वय २७ रा. रुद्रेश्वर नगर, एलआयसी काॅलनी, लातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शंकर गुलाब पुरी (वय ५०) हे औसा राेडवरील मराठवाडा लंच हाेम येथे कामाला हाेते. दरम्यान, येथील पाण्याच्या हाैदात असलेली इलेक्ट्रिक माेटर आणि वायर असुरक्षित असताना, वायर कट असतानाही मयत शंकर पुरी यांना इलेक्ट्रिक माेटरवर पाणी भरण्याचे-उपसण्याचे काम लावले. यावेळी इलेक्ट्रिक माेटरीचे वायर कट झालेल्या वायरचा विद्युत प्रवाह हाैदावर असलेल्या पत्र्यामध्ये उरतला. यावेळी शंकर पुरी यांना विजेचा जबर धक्का बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत कामगाराच्या मृत्यू प्रकरणी विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात अनिल शामराव खराटे (रा. साळे गल्ली, लातूर) याच्याविराेधात गुरनं. २५६ / २०२३ / कलम ३०४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पाेलिस निरीक्षक उदय सावंत करत आहेत.