कामगारांनी मुदत नाकारली; बैठक निष्फळ! बाजार समिती, हमाल- मापाडींचा संप सुरुच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 08:19 PM2024-04-15T20:19:46+5:302024-04-15T20:19:56+5:30
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जवळपास दीड हजार क्विंटलपर्यंत शेतमालाची आवक होत आहे.
हरी मोकाशे
लातूर : हमालीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी बाजार समितीतील माथाडी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी बैठक घेण्यात आली. विनाविलंब हमालीत वाढ करावी, अशी भूमिका कामगारांनी घेतल्याने ही बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे चौथ्या दिवशीही बाजार बंद राहणार आहे.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या जवळपास दीड हजार क्विंटलपर्यंत शेतमालाची आवक होत आहे. त्यात सर्वाधिक आवक सोयाबीनची असून, त्यापाठोपाठ हरभरा, तुरीसह अन्य शेतमालाची आहे. दरम्यान, बाजार समितीतील माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी, अशी मागणी करीत फेब्रुवारीत बेमुदत संप पुकारला होता. तेव्हा १५ दिवसांत हमालीच्या दरात वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे माथाडी कामगारांनी संप मागे घेत काम सुरू केले होते. ४५ दिवस उलटले तरी हमालीच्या दरात वाढ न झाल्याने पुन्हा हमाल - मापाडी कामगारांनी शनिवारपासून संप सुरू केला आहे.
माथाडी कामगार मागणीवर ठाम
बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी संचालक सुधीर गोजमगुंडे, शिवाजी कांबळे यांच्यासह महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट ॲण्ड जनरल कामगार युनियन, हमाल - मापाडी - गाडीवान संघटना आणि लोकसेवा माथाडी कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत तोडगा काढण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा कामगारांनी नकार देत आमच्या मागणीवर ठाम राहिले.
एमआयडीसीतील माथाडी कामगारांचे आंदोलन
एमआयडीसीतील माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी, अशी मागणी करीत सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. एमआयडीसीत जवळपास शंभरपेक्षा अधिक दालमिल असून, माथाडी कामगार सरासरी २ हजार आहेत. आंदोलनामुळे शुकशुकाट दिसून येत होता.
२१ एप्रिलपर्यंत बाजार पूर्ववत करू
माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी बैठक झाली. मात्र, त्यात तोडगा निघाला नाही. येत्या २१ एप्रिलपर्यंत ही समस्या सोडवून बाजार समिती पूर्ववत सुरू करण्यात येईल.
- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती