श्रमिक आई-वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले चीज; पहिल्याच प्रयत्नात बनली फौजदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 07:33 PM2022-03-11T19:33:46+5:302022-03-11T19:35:31+5:30

मैना माधव चट हिने मैदानी चाचणीत शंभरपैकी शंभर गुण मिळवले आहेत

working parents daughter became PSI in her first attempt! | श्रमिक आई-वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले चीज; पहिल्याच प्रयत्नात बनली फौजदार!

श्रमिक आई-वडिलांच्या कष्टाचे लेकीने केले चीज; पहिल्याच प्रयत्नात बनली फौजदार!

Next

- हणमंत गायकवाड
लातूर : अल्पभूधारक आणि मोलमजुरी करून गुजराण करणाऱ्या श्रमिक आई-वडिलांच्या पोटी जन्मलेल्या एका लेकीने कष्टाचे चीज केले. ती पहिल्याच प्रयत्नात फौजदार बनली आहे. पहाटे उठून मैदानी सराव करणाऱ्या या मुलीला गावामध्ये अनेकजण हिणवायचे. आता ती फौजदार झाल्याने हारेतुरे घेऊन स्वागतासाठी तेच पुढे येत आहेत. या लेकीचे नाव आहे मैना माधव चट.

अवर्षणग्रस्त व डोंगरी तालुका म्हणून परिचित असलेल्या जळकोट तालुक्यातील डोमगाव येथील माधव चट यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. दोन-तीन एकरचे धनी असलेले माधव चट हाताने अपंग. तरीही त्यांनी पाचही मुलांना दहावीपर्यंत कसेबसे शिकविले. तीन नंबरची मैना जिद्दी आणि अभ्यासू. तिने दहावीनंतर पुढे शिकायचे ठरविले. अहमदपूरच्या महात्मा गांधी विद्यालयातून ती बी.कॉम. झाली. आणि लागलीच सन २०१६ पासून तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केेली. 

ही तयारी करीत असताना दयानंद वाणिज्य महाविद्यालयातून ती एम. कॉम. उत्तीर्णही झाली. ज्ञानप्रबोधिनीचे प्रा. सुधीर पोतदार यांनी मुलीची जिद्द आणि परिस्थिती पाहून मार्गदर्शन केले आणि ती सन २०१९ मध्ये झालेल्या एमपीएससीची मेन परीक्षा उत्तीर्ण झाली. परंतु, कोविड आणि अन्य कारणांमुळे निकाल जाहीर झाला नव्हता. तिला मैदानी चाचणीत शंभरपैकी शंभर गुण मिळाले. लेखी परीक्षेत २०० पैकी १०८ आणि मुलाखतीमध्ये ४० पैकी २६ गुण मिळाले असून, ती फौजदार पदासाठी पात्र ठरली आहे. तिचे आता सर्वत्र कौतुक होत आहे.

माझ्या आई-वडिलांनी पोटाला पिळ दिला...
माझ्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून मला शिकविले. पोटाला पिळ दिला. त्यामुळे मी जिद्दीला पेटून अभ्यास केला. बी.कॉम., एम.कॉम. करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांना जाते. इकडे प्रा. पोतदार यांनी मैदानी सरावासाठी प्रा. रेड्डी यांना मार्गदर्शन केले. त्यांनाही या यशाचे श्रेय मी देऊ इच्छिते. जिद्दीने अभ्यास केल्यास काहीही सहज शक्य आहे, असे मैना चट आपल्या यशावर प्रतिक्रिया नोंदविताना म्हणाली.

आमच्या कुटुंबात मीच पदवीधर...
कुटुंबातच काय आमच्या खाणदानात मलाच शिक्षणाची संधी मिळाली. काबाडकष्ट करून आई-वडिलांनी ती संधी दिली. पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन मी स्पर्धा परीक्षेला गवसणी घातली आहे. गरिबीतही शाळा शिकता येते, असेही मैना चट म्हणाली.

Web Title: working parents daughter became PSI in her first attempt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.