लातुरात १९,५०३ घरकुलांची कामे अपूर्ण; लाभार्थ्यांच्या जाणून घेतल्या जाणार व्यथा !
By हरी मोकाशे | Published: February 8, 2023 06:33 PM2023-02-08T18:33:09+5:302023-02-08T18:35:18+5:30
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत उद्या मेळावा
हरी मोकाशे
लातूर : गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून शासनाच्या वतीने प्रधानमंत्री, रमाई आवास योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातील १९ हजार ५०३ घरकुले अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांचा शुक्रवारी प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येऊन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २० हजार ८५४ घरकुले मंजूर असून त्यापैकी ९ हजार ५२३ पूर्ण झाली आहेत. अद्यापही ११ हजार ३३१ अपूर्ण आहेत. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत २४ हजार ५३२ घरकुले मंजूर असून १६ हजार ३६० पूर्ण आहेत. तर ८ हजार १७२ अपूर्ण आहेत. ही घरकुले पूर्ण करण्यात यावी, यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी बैठक घेऊन काही सूचना केल्या आहेत. शुक्रवारी लाभार्थ्यांचा प्रत्येक ग्रामपंचायतीत मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात समुपदेश करून, घरांचे महत्त्व, अनुदानाची माहिती दिली जाणार आहे. या कामास गती देण्यासाठी पंचायत समिती गणांना नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
समुपदेशन केले जाणार...
घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. त्यात त्यांच्या समस्या जाणून घेऊन समुपदेशन केले जाणार आहे. या मेळाव्यास लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.
- कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा.
घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार...
घरकुलांच्या कामास गती देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शुक्रवारी लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. मुदतीत घरकुल पूर्ण केलेल्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच घरकुलासाठी जागा नाही, अशांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.
- तुकाराम भालके, गटविकास अधिकारी.