शेतातील गोठ्यात थाटू लागले संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:17 AM2021-04-26T04:17:24+5:302021-04-26T04:17:24+5:30
नागरसोगा : मार्चपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ...
नागरसोगा : मार्चपासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विसकळीत झाले आहे. ग्रामीण भागातही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली आहे. परिणामी, गावातील काही जण शेतातील गोठ्यात जाऊन राहत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. मात्र, मागील चार-पाच महिन्यांत हा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊन लागले होते. मात्र, मार्च- एप्रिलपासून पुन्हा संसर्ग वाढला. राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी घोषित केली. त्यामुळे कामानिमित्ताने शहरात गेलेले नागरिक पुन्हा आपल्या मूळ गावी परतत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांत चिंता वाढली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी येथील काही जण शेतात जाऊन राहत आहेत.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील काही जण शेतात जाऊन राहत आहेत. शेतातील वातावरण आरोग्यास चांगले असल्याने आणि संपर्क होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची भीती कमी झाली आहे. दरम्यान, शेतात वीज गुल होत असल्याने नवा प्रश्न निर्माण झाला आहे. महावितरणने याकडे लक्ष देऊन शेतात सिंगल फेजद्वारे २४ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
शेतात वन्यजीवांचा वावर असतो, तसेच साप, विंचूची भीती असते. रात्री अंधारात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतातील वातावरण चांगले...
नागरसोगा येथील तुकाराम पटवारी, बाबू गिरी, अजय पाटील, संतोष माळी, बाबा गांगले यांच्यासह गावातील अन्य काही नागरिक कुटुंबासह शेतात वास्तव्यास गेले आहेत. शेत शिवारातील वातावरण आरोग्यास चांगले असल्याने व संपर्क होत नसल्याने संसर्गाची भीती अत्यंत कमी आहे. त्यामुळे शासन नियमांचे आपोआप पालन होते.
दुपारच्या वेळी मुले शेतातील आंबा, चिकू, पेरूचा आस्वाद घेत आहेत, तसेच विविध खेळांचा आनंद लुटत आहेत, असे शेतात राहण्यास गेलेल्या कुटुंबांनी सांगितले. मात्र, वीजपुरवठा सुरळीत नसल्याने काही प्रमाणात अडचणी येत आहेत. महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी तुकाराम पटवारी यांनी केली.