जागतिक सायकल दिन: हौसेसाठी नव्हे, व्यायाम, करिअरसाठी पळवा सायकल !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 07:58 AM2023-06-03T07:58:58+5:302023-06-03T08:00:06+5:30
सायकलिंगमुळे शरीररचना उत्तम राहते. रक्तदाब व इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
- महेश पाळणे
लातूर : कैंची खेळत-खेळत सायकल शिकण्याचा छंद अनेकांनी अनुभवला आहे. मात्र, आता बालवयातच मुलांना मोपेड दुचाकी मिळत असल्याने सायकलिंगचा आनंद दुरावला जात आहे. अनेक युवकही हौस म्हणून सायकल घेतात. मात्र, कालांतराने त्याही धूळ खात पडतात. मात्र, असे न करता व्यायाम व करिअरसाठी सायकलिंग करणे उत्तम असल्याचा सल्ला राष्ट्रीय पातळीवरील सायकलपटू व तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
सायकलिंग हा एरोबिक्स व्यायामप्रकार आहे. ज्याच्या नियमित व्यायामाने शरीर सुदृढ राहते. निरोगी जीवनशैली दर्शविणारा एक व्यायामप्रकार म्हणूनही सायकलिंगकडे पाहिले जाते. जागतिक स्तरावर सायकलिंग हा क्रीडाप्रकार नावाजलेला आहे. यात टूर दी फ्रान्स ही स्पर्धा प्रसिद्ध आहे. सायकलिंग हा खेळ तीन प्रकारांत समाविष्ट होतो. ट्रक सायकलिंग, रोड सायकलिंग व एम.टी.बी. सायकलिंग. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया ही संस्था भारतातील सायकलिंगची मुक्त संघटना आहे. त्यांच्या अंतर्गत महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन ही संघटना खेळाचा प्रचार व प्रसार करते.
केंद्र सरकारच्या मिशन ऑलिम्पिकअंतर्गत सायकलिंग या खेळाचा समावेश आहे. केंद्र शासनामार्फत प्रतिवर्षी संपूर्ण भारतातून २०० सायकलपटूंची निवड करून खेलो इंडियाअंतर्गत विविध प्रशिक्षण केंद्रांवर प्रशिक्षण दिले जाते. जागतिक स्तरावर भारत यूथ सायकलिंगमध्ये क्रमांक १ वर आहे. तसेच नोकरीसाठीही सायकलिंगच्या खेळाडूंसाठी जागा राखीव आहेत. त्यामुळे या खेळातही युवकांना करिअर करण्याची संधी आहे. उत्तम आरोग्यासोबत करिअरचीही संधी असल्याने हा खेळ जोपासणे आवश्यक आहे. राज्यात सायकलिंग खेळात पश्चिम महाराष्ट्राचा दबदबा दिसून येतो. मराठवाड्यातही सायकलिंगला खेळ म्हणून पाहणे गरजेचे आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत सायकलिंग हा खेळ असल्याने पालकांनीही याकडे सकारात्मक पाहून आपल्या पाल्याला छंदासोबत सायकलिंगसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
कोविडनंतर वाढले सायकलिंग
कोविडकाळात आरोग्याचे महत्त्व दिसून आले. त्यामुळे जॉगिंग, रनिंगसह नागरिकांनी सायकलिंगचाही व्यायामासाठी वापर केला. शहरासह जिल्ह्यातही सायकलिंगची क्रेझ वाढली आहे. आरोग्यासाठी अनेकजण सायकलिंग करतानाचे चित्र आहे. ग्रुप सायकलिंगही जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.
दुहेरी उद्दिष्ट साध्य हाेईल
मनोरंजन आणि व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून पालकांनी लहान वयातच आपल्या मुलांना सायकलिंगकडे वळविले तर दुहेरी उद्दिष्ट साध्य होईल. मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी सायकलिंग हाही पर्याय उत्तम ठरू शकतो. करिअरसाठीही हा खेळ उत्तम आहे.
- संघर्ष शृंगारे, राष्ट्रीय सायकलपटू तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता.
शरीररचना उत्तम राहण्यासाठी मदत
सायकलिंगमुळे शरीररचना उत्तम राहते. रक्तदाब व इतर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. गुडघेदुखी व मानेचा त्रासही कमी होतो. हृदय, फुप्फुसे, मांसपेशी व हाडांना मजबुती मिळते. शरीरातील रक्ताभिसरणही सायकलिंगमुळे सुधारते.
- डॉ. विमल होळंबे-डोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय.