जागतिक मानसिक आरोग्य दिन : आजारी पडणाऱ्या मनालाही जपा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 12:20 PM2018-10-10T12:20:41+5:302018-10-10T12:28:51+5:30
जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे.
लातूर : शरीर ज्याप्रमाणे आजारी पडते, त्याचप्रमाणे मानवी मनही आजारी पडत असते. शारीरिक आरोग्याबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती आणि प्रबोधन केले जाते. मात्र मानसिक आरोग्याबाबत अद्यापही जाणीव जागृती केली जात नाही. त्यामुळे आजारी पडणाºया मनालाही आपण जपले पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी दिला.
जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. जागतिक पातळीवर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांचे प्रमाण १० टक्क्यांच्या घरात आहे. मात्र भारतामध्ये हेच प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. मानसिक आजाराचे बारा प्रकार असून, वेगवेगळ्या प्रकारचे २७५ आजार आहेत. परिणामी, प्रत्येकाने स्वत:वरील ताण-तणाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. वैयक्तिक मानसिक आरोग्य उत्तम असेल, तर त्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होतो. एकिकडे प्रगतीच्या तुलनेत आपण भरारी घेतोय. मात्र मानसिक आरोग्याच्या बाबतीत हा आलेख खालावतोय. ही बाब देशासाठी चिंतेची आहे. आरोग्यावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्था लोकसंख्येच्या तुलनेत अल्प आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर सर्वांनी पुढे येऊन मानसिक आजाराचा सामना करणे गरजेचे आहे. सोशल मीडियामुळे आपण अभासी जीवन जगतोय. वास्तविक जीवनापासून आपण दूर जातोय. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आहे. मात्र त्याचा अतिरेक आरोग्यासाठी घातक आहे. मोबाईल वापरामुळे नवनवीन आजार पुढे येत आहेत, असेही डॉ. पोतदार म्हणाले.
उत्तम आरोग्यासाठी आहार, व्यायाम गरजेचा
मानसिक आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे. वैचारिक वाचन, तत्वज्ञानाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. उत्तम आरोग्यासाठी योगासन, व्यायाम, सकस आहार आणि खेळाला प्राधान्य दिले पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये या सर्व बाबींचे नियोजन केले, तर मनावरील ताण आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक आजार प्रत्येकाला टाळता येईल. मानसिक आजारापाठीमागच्या शास्त्रीय कारणांबाबत जनजागृती झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.