जागतिक विक्रमाला सुरूवात; लातूरची सृष्टी जगताप करणार सलग १२६ तास नृत्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 08:01 AM2023-05-29T08:01:29+5:302023-05-29T08:03:34+5:30
आजपासून ३ जून पर्यंत नृत्यअविष्कार
लातूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त लातूरच्या सृष्टी जगताप या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने जागतिक विक्रमात नोंद होण्याच्या दृष्टीने सोमवारी सकाळी ७ वाजता नृत्याला प्रारंभ केला. ती सलग १२६ तास नृत्य अविष्कार सादर करणार आहे. हा सलग नृत्यअविष्कार लातूरकरांना रात्र दिवस पाहता येणार आहे . जागतिक विक्रमाची नोंद घेणाऱ्या गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसचे सर्व सोपस्कारही पूर्ण करण्यात आले आहेत . सोमवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., सीईओ अभिनव गोयल, प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या उपस्थित प्रारंभ झाला. यावेळी सृष्टी जगताप, वडील सुधीर जगताप , आई संजीवनी जगताप , आजोबा बबन माने , रोहिणी माने ,विराज माकणीकर , किरण माने, यांची उपस्थिती होती.
लातूरच्या दयानंद महाविद्यालयात अकरावी विज्ञानमध्ये शिकणाऱ्या सृष्टी जगताप हिने वर्ष-२०२१ मध्ये सलग २४ तास नृत्य सादर करीत आशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद केलेली आहे . त्यानंतर आता सलग १२६ तास नृत्य सादर केल्याचा नेपाळ येथील नृत्यांगनेच्या नावावर असलेला विक्रम ती मोडणार आहे.
भारताच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांचे निमित्त साधून सृष्टीने हा जागतिक विक्रम भारताकडे खेचून आणण्याचे ठरवले आहे . यासाठी तिने कठोर परिश्रम करीत सलग १०० तासा पेक्षा जास्त नृत्य सादर करण्याचे प्रात्यक्षिक अनेकदा केले आहे . यासाठी ती दररोज पहाटे पासूनच विशिष्ट प्रकारचा व्यायाम करते आहे .
लातूरची सृष्टी जगताप करणार सलग १२६ तास नृत्य#Laturhttps://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/xEQvUlkdBj
— Lokmat (@lokmat) May 29, 2023
सृष्टी ही नृत्य विशारद आहे . दहावीला तिला ९९ टक्के गुण होते . आता ती अकरावी पूर्ण करून बारावीच्या वर्गात जाणार आहे .
जागतिक विक्रम असल्याने सृष्टीला संपूर्ण लातूरवासियांनी उपस्थित राहून प्रोत्साहन द्यावे असे आवाहन सृष्टी जगताप आणि तिच्या कुटूंबियानी केली आहे . सलग नृत्य सादर करताना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या नियमा प्रमाणे तासाला 5 मिनिटे तिला विश्रांती घेता येणार आहे. सृष्टी जगताप सलग नृत्य करणार असल्याने लातूरकरांसाठी दयानंद सभागृह पूर्ण वेळ खुले असणार आहे . मध्यरात्री आणि पहाटे देखील प्रेक्षक रसिकांनी प्रोत्साहन द्यायला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .