जागतिक थायलेसेमिया दिन : अनुवंशिक थायलेसेमियाची लातुरात २४७ बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 02:03 PM2019-05-08T14:03:39+5:302019-05-08T14:04:42+5:30

आजार रोखण्यासाठी विवाहापूर्वी रक्तचाचणी आवश्यक

World Thaylesemia Day: 247 babies of genetic thiolasemia in Latur | जागतिक थायलेसेमिया दिन : अनुवंशिक थायलेसेमियाची लातुरात २४७ बालके

जागतिक थायलेसेमिया दिन : अनुवंशिक थायलेसेमियाची लातुरात २४७ बालके

googlenewsNext

लातूर : थायलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे़ जिल्ह्यात दरवर्षी जवळपास ८ बालकांमध्ये हा आजार आढळून येतो़ सध्या जिल्ह्यात २४७ बालकांना हा आजार आहेत़ त्यामुळे हा आजार रोखण्यासाठी विवाहापूर्वी पती- पत्नीने रक्तचाचणी करुन घेणे गरजेचे असून शासकीय रुग्णालयात ती मोफत केली जाते, असे बालरोग तज्ज्ञांनी सांगितले़

अनुवंशिक असलेल्या थायलेसेमिया आजारात सर्वसाधारण, गंभीर आणि इंटरमेडिएट असे तीन प्रकार आहेत़ गंभीर आजार असलेल्या बालकांमध्ये ३ ते ६ महिने अथवा वर्षभरापर्यंत लक्षणे आढळून येतात़ तर इंटरमेडिएट अवस्थेतील बालकांमधील लक्षणे २ ते ३ वर्षांनी निदर्शनास येतात़ या आजारामुळे रक्तातील लाल पेशी तयार होत नाहीत़ परिणामी, बालकामध्ये स्थिर १० ग्रॅम रक्त ठेवण्यासाठी रुग्णांना बाहेरील रक्त द्यावे लागते़ विशेष म्हणजे, चार आठवड्यांच्या आत रक्ताची गरज भासते़ त्यामुळे या रुग्णांसाठी महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सूचनेनुसार मोफत रक्तपुरवठा करण्यात येतो़ जिल्ह्यात २४७ बालकांना हा आजार असून दरवर्षी जवळपास ८ बालकांमध्ये हा आजार आढळून येतो़ तसेच मृत्यूचे प्रमाण हे वार्षिक तीन असे आहे़

या आजारामुळे बालकांचे वजन घटते, जुलाब, उलट्या होणे, ताप भरणे, जंतू संसर्ग, चेहरा निस्तेज होणे, थकवा येणे अशी लक्षणे आहेत़ हा आजार टाळण्यासाठी प्रत्येकाने विवाहापूर्वी यासंदर्भातील रक्त तपासणी करुन घेणे महत्त्वाचे असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ़ सुनील होळीकर यांनी सांगितले़ तसेच पहिल्या बाळास हा आजार झाला असल्यास दुसऱ्या बाळाला होऊ नये म्हणून निदान करता येते़ रक्त तपासणीची सुविधा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे़

४२१ रुग्णांना मोफत रक्त़
जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीसह एकूण सहा रक्तपेढ्यांमधून आतापर्यंत ४२१ रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आले असल्याचे राज्य संक्रमण परिषदेला पाठविण्यात आलेल्या अहवालात रक्तपेढ्यांनी नमूद केले आहे़ विवाहापूर्वी पती- पत्नीची रक्त तपासणी तसेच माता गरोदर असतानाही रक्त तपासणी केल्यास हा आजार टाळता येऊ शकतो, असे थायलेसेमिया फाऊंडेशनचे सचिव प्रमोद बानाटे यांनी सांगितले़

बालकांची वाढ खुंटते
थायलेसेमियाग्रस्त बालकांमध्ये लाल रक्तपेशी तयार होत नाहीत़ बालकांची उंची, शारीरिक, बौध्दिक वाढ खुंटते़ त्यामुळे बाहेरील रक्तपुरवठा करावा लागतो़ परिणामी, लोहाचे प्रमाण वाढून त्याचा किडनी, मेंदू, हृदयावर थर साचून धोका पोहोचण्याची भीती असते़ हे प्रमाण रोखण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत गोळ्या, व्हॅक्सिन मोफत उपलब्ध करुन दिले जातात, असे बालरोगतज्ज्ञ डॉ़ सुनील होळीकर यांनी सांगितले़

Web Title: World Thaylesemia Day: 247 babies of genetic thiolasemia in Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.