खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, पुण्याच्या मल्लांचा बोलबाला
By हरी मोकाशे | Published: March 10, 2024 06:55 PM2024-03-10T18:55:13+5:302024-03-10T18:55:55+5:30
तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे.
उदगीर (लातूर): उदगीरात सुरू असलेल्या खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा रणजित पाटील, पुणे जिल्ह्याचा निखिल कदम व पुणे शहरचा साकेत यादव या मल्लांनी प्री स्टाईल प्रकारात आपापल्या वजनी गटात बाजी मारून सुवर्णपदक पटकाविले. ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूरचा वैभव पाटील व नितीन कांबळे तसेच पुणे जिल्ह्याचा दिग्विजय भोंडवे यांनी आपापल्या गटात वर्चस्व गाजवित सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. स्पर्धेत कोल्हापूर आणि पुण्याच्या मल्लांचा बोलबाला पहायला मिळाला.
येथील तालुका क्रीडा संकुलात ही कुस्ती स्पर्धा सुरू आहे. रविवारच्या धावत्या दौऱ्यात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दूरदृष्य प्रणालीव्दारे दुसऱ्या दिवशीच्या कुस्ती स्पर्धा नियोजनाचा आढावा घेतला. प्री स्टाईल प्रकारातील ५७ किलो वजनी गटात गतविजेत्या कोल्हापूरच्या रणजित पाटील यंदाही निर्विवाद वर्चस्व गाजवित दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. त्याने अंतिम लढतीत लातूरच्या आकाश गदेला १०-० गुण फरकांनी लोळवले. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात अहमदनगरचा ओम वाघ व सांगलीचा निनाद बडरे कांस्यपदकाचे मानकरी ठरले. ७० किलो वजनी गटात पुणे जिल्ह्याच्या निखिल कदमने कोल्हापूरच्या निलेश हिरूगडेचा ३-० गुण फरकाने पाडाव करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. निलेशला रौप्यपदक मिळाले, तर कोल्हापूरचा अनुप पाटील व साताऱ्याचा ओंकार फडतरे यांनी कांस्यपदक जिंकले. ९७ किलो वजनी गटात पुणे शहरचा साकेत यादव सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. कोल्हापूरच्या शशिकांत बांगरला रौप्यपदक, सोलापूरचा लक्ष्मण पाटील व सातारचा अजय थोरात यांना कांस्यपदके मिळाली.
सांगलीच्या प्रतिक्षा बागडीला सलग दुसरे सुवर्ण...
डबल महाराष्ट्र केसरी व एक वेळची राष्ट्रीय पदकविजेती सांगलीची प्रतिक्षा बागडी हिने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत खाशाबा जाधव चषक महिला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ७६ किलो गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक जिंकले. कोल्हापूरच्या वेदिका सासणेला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुण्याची सिद्धी शिंदे व कोल्हापूरची अंकिता फातले कांस्यपदकाच्या मानकरी ठरल्या. ५९ किलो गटात पुणे शहरची कल्याणी गदेकर सुवर्णपदकाची मानकरी ठरली. पुणे जिल्ह्याच्या आकांक्षा नलावडेला रौप्यपदक, तर कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला कांस्यपदक मिळाले. ५० किलो गटात पुणे शहरची ज्ञानेश्वरी पायगुडे व कोल्हापूरची आर्या पाटील यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. कोल्हापूरची प्रमिला पवार व अहमदनगरची आयशा शेख यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.