पिवळ्या ज्वारीचा बाजारात तोरा; आवक कमी, दर ४१०० रुपये प्रतिक्विंटल

By हणमंत गायकवाड | Published: May 29, 2024 03:38 PM2024-05-29T15:38:44+5:302024-05-29T15:38:58+5:30

शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळ्या ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला मधुमेही रुग्णांना दिला जातो; पण आवक कमी असल्यामुळे या ज्वारीचा मोठा तोरा आहे.

Yellow sorghum rates high in the market; Income less, rate Rs 4100 per quintal | पिवळ्या ज्वारीचा बाजारात तोरा; आवक कमी, दर ४१०० रुपये प्रतिक्विंटल

पिवळ्या ज्वारीचा बाजारात तोरा; आवक कमी, दर ४१०० रुपये प्रतिक्विंटल

लातूर : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात गहू, ज्वारी आणि पिवळी ज्वारी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रेलचेल दिसत आहे; मात्र या सर्वच ज्वारीची आवक बाजारात कमी आहे. त्यातल्या त्यात पिवळ्या ज्वारीची आवक तर फारच कमी आहे. शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळ्या ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला मधुमेही रुग्णांना दिला जातो; पण आवक कमी असल्यामुळे या ज्वारीचा मोठा तोरा आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये शुक्रवारी मोठ्या ज्वारीची ५२० क्विंटलची आवक होती. या ज्वारीचा कमाल ३ हजार ४८० रुपये किमान २ हजार ६००, तर सर्वसाधारण ३ हजार तीनशे रुपये होता. पिवळ्या ज्वारीची आवक फक्त ६८ क्विंटल होती. या ज्वारीचा कमाल दर ४ हजार २१० रुपये, किमान ४ हजार, तर सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल होता. मागणी जास्त आणि आवक कमी अशी परिस्थिती या ज्वारीची बाजारात आहे.

गव्हाची आवक बाजारात कमी असून कमाल दर चार हजार शंभर, किमान २ हजार ४०५ रुपये, तर सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर आहे. रोजच्या आहारात ज्वारी, गहू, पिवळी ज्वारी, हायब्रीड ज्वारी, बाजरी या धान्याची गरज मोठ्या प्रमाणात लागते; मात्र बाजारात या धान्याची आवक कमी असल्यामुळे भाव वाढलेला आहे. सगळ्यात जास्त दर पिवळ्या ज्वारीला आहे. कारण ही ज्वारी मधुमेह रुग्णांसाठी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची असल्याने या ज्वारीचा सर्वाधिक दर असल्याचे बाजारातून सांगण्यात आले.

हे आहेत पिवळ्या ज्वारीचे फायदे:
भरपूर फायबर
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते
उच्च प्रथिने
भरपूर लोह (आयर्न)
हाडांच्या आरोग्यासाठी चांगले
जीवनसत्त्वे, खनिजे आणि सूक्ष्म पोषक घटकांनी युक्त
वजन कमी होणे
हृदयाचे आरोग्य सुधारते, रक्ताभिसरण वाढवते

लातूरच्या मार्केट यार्डात अशी होती शेतमालाची आवक
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात शुक्रवारी गूळ ३२१ क्विंटल, गहू ५७ क्विंटल, ज्वारी हायब्रीड ४७ क्विंटल, ज्वारी रब्बी ५३० क्विंटल, ज्वारी पिवळी ६८ क्विंटल, हरभरा ४२९८ क्विंटल, तूर ९७८ क्विंटल, करडई १०० क्विंटल, सोयाबीन १० हजार सत्तावीस क्विंटल.

तुरीला सर्वाधिक ११,८५० रुपये प्रतिक्विंटल दर
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतीच्या मशागतीचे कामे सुरू आहेत. सात जूनपासून पावसाळा सुरू होतो. त्यामुळे बळीराजा बाजारात जो काही शेतमाल आहे त्याची विक्री करून खरिपाच्या पेरणीची तयारी करीत असतो. सध्या तुरीला सर्वाधिक ११ हजार ८५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

Web Title: Yellow sorghum rates high in the market; Income less, rate Rs 4100 per quintal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.