युवा फलंदाज एकनाथ देवडेचा झंझावात; गुजरातविरुद्धही ठोकली सेंचुरी, स्पर्धेत शतकांची हॅट्ट्रिक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 07:05 PM2024-02-05T19:05:36+5:302024-02-05T19:05:54+5:30
पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळताना चारपैकी तीन सामन्यांत ठोकले शतक
- महेश पाळणे
लातूर : लातूरचा उदयोन्मुख अष्टपैलू एकनाथ देवडेने आपल्या फलंदाजीतील झंझावात कायम ठेवला असून, सोमवारी गुजरातविरुद्ध सलामीला येत १२५ धावा ठोकत पश्चिम विभागीय स्पर्धेतील तिसरे शतक ठोकत महाराष्ट्र संघाला सुस्थितीत नेऊन ठेवले आहे.
राजकोट येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेत लातूरच्या एकनाथ देवडेने गुजरातविरुद्ध शतकी खेळी करीत स्पर्धेतील लगातार तिसरे शतक ठोकत हॅट्ट्रिक साधली आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्र संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात ३३८ धावा केल्या. यात सर्वाधिक एकनाथच्या १५२ चेंडूंत १२५ धावा होत्या. त्याने दोन षट्कार व १४ चौकार या खेळीत ठोकले. एकंदरित, राष्ट्रीय स्पर्धेतील लातूरच्या या नवोदित खेळाडूची खेळी क्रिकेट वर्तुळात चर्चिली जात आहे.
चारपैकी तीन सामन्यांत शतक...
पश्चिम विभागीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला चार सामने खेळायचे होते. १४ वर्षांखालील या गटात पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध ७९ धावांची खेळी एकनाथने केली. त्यानंतर बडोदा संघाविरुद्ध ११५, तर सौराष्ट्रविरुद्ध १२६ धावांची खेळी त्याने केली. सोमवारी गुजरातविरुद्ध सलग तिसरे शतक ठोकत फलंदाजीतील क्षमता त्याने दाखवून दिली. मुंबईविरुद्धही थोडक्यात त्याचे शतक हुकले होते.