'तुमच्या कुटुंबावर संकट आहे'; जादूटोण्याची भीती दाखवून वृद्ध महिलेकडून ३४ लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 13:56 IST2025-04-21T13:55:55+5:302025-04-21T13:56:16+5:30
विधी करण्याच्या बहाण्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ३३ लाख ९० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली.

'तुमच्या कुटुंबावर संकट आहे'; जादूटोण्याची भीती दाखवून वृद्ध महिलेकडून ३४ लाख उकळले
उदगीर (जि. लातूर) : शहरातील जळकोट रोड परिसरात राहणाऱ्या एका ५८ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरी दोन महिलांनी वारंवार जाऊन तुमच्या घरावर करणी केली आहे, तुमच्या कुटुंबावर संकट आहे, असे म्हणून भीती निर्माण केली. विधी करण्याच्या बहाण्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ३३ लाख ९० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, आरोपी सुरया वाजीद मुंजेवार (रा. जळकोट रोड) व फरीदा युसूफ शेख (रा. हैदराबाद) यांनी संगनमत केले. त्या दोघी फिर्यादी अस्मतुन्नीसा जब्बारोद्दीन परकोटे (५८, रा. कासीमपुरा, जळकोट रोड, उदगीर) यांच्या घरी ७ सप्टेंबर २०२२ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत वारंवार गेल्या होत्या. ‘तुमच्या घरावर करणी केली आहे. काळी जादू केली आहे, तसेच तुमच्या कुटुंबावर संकट आहे. ते आम्ही दूर करतो, असे म्हणून अस्मतुन्नीसा यांच्या मनात भीती निर्माण केली.
घरातील अंगणामध्ये जादूटोण्याचा विधी करून काही तरी पुरले. त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीचे व तिच्या मुलीचे, सुनेचे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण ३३ लाख ९० हजार रुपयांचा काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी परकोटे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री वरील दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप गाडे हे करीत आहेत.