वीजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, लातुरात महावितरणच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक
By राजकुमार जोंधळे | Published: May 14, 2024 10:14 PM2024-05-14T22:14:16+5:302024-05-14T22:14:50+5:30
सहा जणांवर गुन्हा
राजकुमार जाेंधळे / लातूर : तालुक्यातील बाभळगाव येथील वीज उपकेंद्रात रविवारी वीजेच्या धक्क्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली हाेती. याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात महावितरणाच्या एकूण सहा जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक केल्याची माहिती पाेलिसांनी मंगळवारी रात्री दिली.
पाेलिसांनी सांगितले, बाभळगाव येथील प्रकाश उर्फ बाळू भुजंग सोनकांबळे (वय ३०) हा तरुण रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वीजेच्या डीपीवर दुरुस्तीच्या कामासाठी चढला हाेता. वीजेच्या धक्क्याने त्याचा डीपीवरच मृत्यू झाला. हा तरुण महावितरणाचा कर्मचारी नव्हता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्याला डीपीवर दुरुस्तीच्या कामासाठी पाठवले हाेते. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी, ग्रामस्थांनी वीज उपकेंद्राकडे धाव घेतली. महावितरणच्या संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी साेमवारी पहाटेपर्यंत वीज उपकेंद्रातच ठिय्या मांडला हाेता. दरम्यान, घटनास्थळी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देवून पाहणी केली. संतप्त कुटुंबीय, नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. साेमवारी पहाटे या तरुणाचा मृतदेह लातुरातील शासकीय वैद्यकीय माहाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला हाेता. शवविच्छेदनानंतर दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत लातूर ग्रामीण पाेलिस ठाण्यात अभिजीत सुरेश सोनकांबळे (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आपरेटर तानाजी लोकरे (वय ५५) अभियंता ओमकार तराळकर (वय २५), कल्याण मस्के (वय ४३), सुधाकर साठे (वय ४३), विशाल शिंदे (वय ४२), यंत्र चालक रमाकांत लोखंडे (वय ४०) यांच्याविराेधात गुरनं ११२ /२०२४ कलम ३०४, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
फाेन करुन कर्मचाऱ्यांनी प्रकाशला घेतले बाेलावून...
प्रकाश उर्फ बाळू भुजंग सोनकांबळे यांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी फाेन करुन बाेलावून घेतले. त्यानंत दुरुस्तीच्या कामसाठी डीपीवर चढण्यास सांगितले. यावेळी वीजेच्या धक्क्याने प्रकाश या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, असे पाेलिस ठाण्यात दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
तिघांना अटक, अन्य तिघांचा शाेध...
लातूर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या सहा जणांपैकी यंत्रचालक रमाकांत लाेखंडे, तंत्रज्ञ कल्याण मस्के, विशाल शिंदे यास अटक करण्यात आली आहे. तर अन्य तिघा कर्मचाऱ्यांच्या मागावर पाेलिस पथक असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. - प्रेमप्रकाश माकाेडे, पाेलिस निरीक्षक, लातूर