मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, उदगीर येथे दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल
By राजकुमार जोंधळे | Updated: July 11, 2024 00:03 IST2024-07-11T00:02:58+5:302024-07-11T00:03:21+5:30
दोघांविराेधात खुनासह ॲट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल

मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू, उदगीर येथे दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल
राजकुमार जाेंधळे, उदगीर (जि. लातूर): तरुणाच्या डाेक्यावर काहीतरी मारून गंभीर जमखी केल्याची घटना १६ जून राेजी मादलापूर (ता. उदगीर) गावानजीक रात्री घडली हाेती. उपचारादम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पद्माकर शिवाजी सूर्यवंशी (वय ४२, रा. नेकनाळ, ता. देवणी) यांनी पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादीचा भाऊ सचिन शिवाजी सूर्यवंशी (वय ३६) याला शिवा रघुनाथ गरिबे आणि महेश विश्वनाथ बिरादार (दोघेही रा. नेकनाळ) यांनी संगनमत करून १६ जून २०२४ राेजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास मादलापूर गावानजीक रोडवर अडवून पोकलेनची काच फोडल्याचा राग मनात धरून जातिवाचक शिवीगाळ केली. शिवाय, डोक्यावर काेणत्या तरी हत्याराने मारून गंभीर जखमी केले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात पद्माकर सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविराेधात खुनासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास निलंगा येथील उपविभागीय पाेलिस अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.