युवराज पन्हाळे हत्येप्रकरणी दोघांना जन्मठेप; पाच निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 08:09 PM2018-07-27T20:09:38+5:302018-07-27T20:09:54+5:30
तरुण व्यावसायिक युवराज पन्हाळे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आरोपी संतोष व्यंकटराव पन्हाळे, मधुकर अनुरथ बस्तापुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
लातूर : तरुण व्यावसायिक युवराज पन्हाळे यांच्या हत्येप्रकरणी शुक्रवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी आरोपी संतोष व्यंकटराव पन्हाळे, मधुकर अनुरथ बस्तापुरे या दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तर या प्रकरणातील पाच जणांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
खाजगी शहर बस सेवेच्या व्यवसायातून युवराज पन्हाळे यांची आदर्श कॉलनी परिसरात ४ डिसेंबर २०१२ रोजी डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात युवराज पन्हाळे यांचा सख्खा पुतण्या संतोष व्यंकट पन्हाळे, मधुकर बस्तापुरे, भाऊ व्यंकट पन्हाळे आदींसह पाच जणांवर शिवाजीनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणाचा शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गोपाळ रांजनकर यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या खटल्यात एकूण आठ आरोपींचा समावेश होता. यापूर्वीच छाया पन्हाळे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. तर सातपैकी दोघांना जन्मठेप सुनावली व उर्वरित पाच जणांची निर्दोष मुक्तता झाली़ सरकार पक्षाच्या वतीने सोलापूर येथील अॅड़ आर. आर. पाटील यांनी विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिले.
सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
कमलाकर अनुरथ ऊर्फ अनिरूद्ध बस्तापुरे (४२, रा. रेणापूर), गोविंद पांडुरंग कुटवाड (३४), व्यंकट पांडुरंग कुटवाड (३४), गणेश अंगद सगर (२३, रा. तिघेही रामवाडी, खरोळा ता. रेणापूर) आणि व्यंकट ज्ञानोबा पन्हाळे (५१, रा. हरंगुळ ताजिलातूर) यांची निर्दोष मुक्तता झाली. युवराज पन्हाळे हे औसा रोडवरील त्यांच्या कार्यालयातून रात्री १० वाजण्याच्या सुमारास आदर्श कॉलनीतील घरी पोहोचले होते. घरासमोर कार उभी करून गेट उघडण्यासाठी उतरले असता त्यांच्यावर हल्ला झाला होता. घटनास्थळी ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी नातेवाईक व मित्रपरिवाराने त्यांना अशोक हॉटेलजवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती. युवराज पन्हाळे यांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायात भरारी घेतली होती.