चेकवर तहसीलदारांच्या सहीनंतर रक्कम वाढवली; लिपिकाचा सात वर्षात २६ कोटींचा अपहार
By राजकुमार जोंधळे | Published: January 31, 2023 06:09 PM2023-01-31T18:09:42+5:302023-01-31T18:11:22+5:30
२६ कोटींचे अपहार प्रकरण; दोघे अटकेत तर दाेन आराेपी अद्यापही फरार
लातूर : २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांच्या अपहार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. आता हा अपहार २६ काेटींवर पाेहोचला आहे. या प्रकरणातील दाेघे आराेपी अद्यापही फरारच आहेत, तर अटकेत असलेल्या दाेघांच्या काेठडीची मुदत साेमवारी संपल्याने त्यांना लातूरच्या न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले. न्यायालयाने २ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या काेठडीत वाढ केली आहे. या अपहार प्रकरणाचा जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीकडून चाैकशी सुरू आहे. त्याचबराेबर, पाेलिसांकडून समांतर तपास केला जात आहे.
पाेलिसांनी सांगितले, अटकेतील मनाेज नागनाथ फुलेबाेयणे (रा.बाेरी, ता.लातूर) हा जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखा शाखा विभागात लिपिक, महसूल सहायक अव्वल कारकून या पदावर कार्यरत हाेता. दरम्यान, त्याच्याकडे विविध प्रकारच्या खरेदीची, विविध शाखा, पुरवठादार यांच्याकडून येणारी देयके तपासून सक्षम प्राधिकार यांच्या मान्यतेने संबंधितांना देयकाचे धनादेश देणे, आरटीजीएस करण्यासाठी बँक व्यवस्थापकास निर्देशपत्र देणे, नाेंदवहीत नाेंद घेणे, बँक व्यवहार हाताळणे आदींची जबाबदारी हाेती. मात्र, मनाेज फुलेबाेयणे याने २६ मे, २०१५ ते ८ जून, २०२२ या काळात बनावट आरटीजीएस तयार करून, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे धनादेशातील मूळ रकमेच्या आकड्यामध्ये स्वहस्ताक्षरात वाढ करून, असे आरटीजीएस, धनादेश स्वत:च्या, मित्राच्या बँक खात्यात जमा केले. यातूनच त्याने तब्बल २२ काेटी ८७ लाख ६२ हजार २५ रुपयांचा अपहार केल्याचे चाैकशीत समाेर आले.
या प्रकरणात एमआयडीसी पाेलिस ठाण्यात मनाेज फुलेबाेयणे, अरुण फुलेबाेयणे, सुधीर रामराव देवकत्ते आणि चंद्रकांत नारायण गाेगडे यांच्याविराेधात गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी मनाेज फुलेबाेयणे आणि चंद्रकांत गाेगडे या दाेघांना अटक केली आहे. ते सध्याला एमआयडीसी ठाण्यांच्या काेठडीत आहेत.
दाेघा आराेपींचा पाेलिसांना चकवा...
काेट्यवधींच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी एका लिपिकासह अन्य तिघांविराेधात २१ जानेवारी राेजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दाेघांना पाेलिसांनी अटक केली आहे, तर अरुण फुलेबाेयणे आणि सुधीर रामराव देवकत्ते हे अद्यापही पाेलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांच्या मागावर पाेलीस पथक असून, त्यांनाही लवकरच अटक केली जाणार आहे, असे पाेलिस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले.
औसा तहसीलमध्ये ८८ लाखांचा अपहार...
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक मनाेज फुलेबायेणे याने औशातही तब्बल ८८ लाखांचा अपहार उघड झाला आहे. हा अपहार त्याने सात दिवसात केल्याचे चाैकशीत समाेर आले आहे. लातूर येथील अपहारासाठी वापरलेली माेड्स त्याने औशातील अपहारातही वापरल्याचे उघड झाले आहे. याची कुणकुण लागताच, तहसीलदारांनी बजावलेल्या नाेटिशीनंतर त्याने ही रक्कम तहसीलदारांना खात्यात जमा केली.