लग्नानंतर पत्नीला हे 7 प्रश्न कधीही विचारु नका! अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:45 PM2018-01-24T15:45:36+5:302018-01-24T15:49:41+5:30
तुमच्या पाहण्यात अशी अनेक जोडपी असतील जी लग्नानंतर काहीवर्षातच विभक्त होण्याचा निर्णय घेतात. या जोडप्याच्या घटस्फोटामागे प्रेमाचा अभाव हे एकमेव कारण नसते.
मुंबई - तुमच्या पाहण्यात अशी अनेक जोडपी असतील जी लग्नानंतर काहीवर्षातच विभक्त होण्याचा निर्णय घेतात. या जोडप्याच्या घटस्फोटामागे प्रेमाचा अभाव हे एकमेव कारण नसते. दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम भावना असते. पण अशा अनेक छोटया-छोटया गोष्टी असतात ज्यामुळे वैवाहिक नात्याला तडा जातो. लग्नानंतर अशा सात गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीही पत्नीला विचारु नका.
- पत्नीला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारु नका. पुरुष अनेकदा पत्नीला तिच्या पहिल्या प्रियकराबद्दल विचारतात. सत्य जाणून घेऊन काहीही फायदा होत नाही. फक्त दु:खच पदरात पडते. पत्नीलाही पती तिच्यावर संशय घेतोय असे वाटते. त्यामुळे दोघांनीही परस्परांना असे प्रश्न विचारु नये.
- पत्नीला तिच्या कौमार्यावरुन कधीही प्रश्न विचारु नका. कदाचित पत्नीचे विवाहाआधी परपुरुषाबरोबर संबंध असू शकतात. तुमच्या आयुष्यातही पत्नीच्या आधी एखादी परस्त्री असू शकते. शरीरसंबंध आले म्हणून चारित्र्यावर संशय घेणे निव्वळ मुर्खपणा आहे. कारण अनेकदा आधीच्या प्रेमप्रकरणामध्ये जोडीदाराने फसवणूक केलेली असू शकते. तुम्ही मनापासून पत्नीला स्वीकारले पाहिजे.
- प्रत्येकाचं स्वत:च असं एक खासगी आयुष्य असतं. पत्नीचही एक असं आयुष्य असू शकतं त्याचा आदर राखला पाहिजे. पत्नी एकांतामध्ये बसली असेल तर तिला कुठलेही उलट-सुलट प्रश्न विचारु नये.
- आपल्या आई-वडिलांप्रमाणे पत्नीच्या आई-वडिलांचाही आदर करा. पत्नी उशिरापर्यंत तिच्या कुटुंबियांबरोबर बोलत असेल तर कुठलेही प्रश्न विचारु नका. त्यामुळे कदाचित ती दुखावली जाईल.
- पत्नीवर घरात राहण्याची सक्ती करु नका. तिला फिरायला बाहेर घेऊन जा. तिला स्वत:ला घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या.
- नोकरदार पत्नी असेल तर ती घर चालवायला तुम्हाला मदतच करेल. पण तिला तेच पैसे कुटुंबिय, मित्रपरिवारावर खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात घ्या. तिला त्यापासून रोखू नका.
- लग्नानंतर पत्नीने जेवण बनवलं पाहिजे अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. पण यासाठी तुम्ही पत्नीवर दबाव टाकू नका. एखादा दिवस तिला जेवण बनवायच नसेल तर तिच्यामागे बडबड करुन तिला हैराण करु नका. नव-याच्या स्वभावातील हे गुण अनेकदा घटस्फोटासाठी कारण ठरतात.