बाल संगोपनाची कला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:39 PM2018-12-11T23:39:21+5:302018-12-11T23:39:42+5:30

अभ्यास न करता कुठलीही गोष्ट मान्य करणे आणि चुकीचा विचार मनात रुजविणे, या गोष्टी दीर्घकालीन दु:ख निर्माण करत राहतात. लहान मुलांच्या बाबतीत नेमकं हेच घडत आलयं.

Art of child rearing | बाल संगोपनाची कला

बाल संगोपनाची कला

Next

- विजयराज बोधनकर

अभ्यास न करता कुठलीही गोष्ट मान्य करणे आणि चुकीचा विचार मनात रुजविणे, या गोष्टी दीर्घकालीन दु:ख निर्माण करत राहतात. लहान मुलांच्या बाबतीत नेमकं हेच घडत आलयं. अगदी पाच-सहा महिन्याच्या बाळापासून ते आठ-नऊ वर्षांच्या मुलापर्यंत आपण विचार केला, तर एक मोठं रहस्य उलगडू शकतं. मूल जन्माला येताना तो एक लख्ख मेंदू सोबत घेऊन येतो. तो सर्व निरीक्षण करीत असतो. आपली सर्व भाषा त्याला समजत असते. कारण आईच्या पोटात असेपर्यंत आईचे विचार तो ग्रहण करीत असतो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच अनेक घरात आजही छोट्याशा बालकाला उचलून घेऊन त्याच्याशी गप्पा मारीत असतात. नक्कीच त्याला बोलता येत नसतं, पण ते बालक हुंकारातून मात्र उत्तमपणे प्रतिसाद देत असते.

याच सुंदर प्रक्रियेत ते बाळ जी भाषा तुम्ही बोलत असाल ती आपल्या मेंदूच्या कप्प्यात साठवून ठेवत असतो. साधारण जन्म झाल्यानंतर एकदीड वर्षात त्याला काहीतरी बोलावेसे वाटत असते. कारण वर्षभरात त्याने जे जे ऐकलेलं असतं, ते तो व्यक्त करण्याच्या प्रयत्नात असते. मम पप अशा शब्दांनी किंवा त्याला भावेल त्या स्वरभाषेतून ते बाळ बोलतांना घरच्यांनाही त्याचे कौतुक वाटत असतं. हळूहळू त्याची बोलण्याची शक्ती वाढतच जाते. त्यामुळे ज्या घरात छोट्या बाळाशी घरातली मंडळी सतत काहीना काही बोलत राहतात, त्या घरातली मुले लवकर बोलण्याचा प्रयत्न करताना दिसत राहतात.

या उलट ज्या घरात, त्याला काय कळतं म्हणून घर गप्प असतं. त्या मुलांच्या कानावर जी भाषा किंवा भावना मनात निर्माण व्हायला पाहिजे त्यांची स्पंदने निर्माणच होत नाहीत. त्यामुळे त्याला व्यक्त व्हायला दुसरा मार्गच मिळत नसतो. आजही घराघरात अगदी छोट्या बाळांच्या देखत टीव्ही चालू असतो. त्यातली चांगली-वाईट दृष्ये त्याच्या मन-बुद्धी पटलावर जाऊन बसण्याची शक्यता असते. त्या टीव्हीवर जशी दृश्यं दिसतील, जशी भाषा ऐकायला येईल तशा भावनेचा बंध त्या बाळाच्या मनात निर्माण होत जातो.

बरीच मुलं चित्रविचित्र वागण्यामागचं हे ही एक कारण असू शकतं. आईच्या पोटात असल्यापासून ते पाच-सहा वर्षांपर्यंत ते बाळ निरीक्षण आणि साठवणूक करत राहते आणि म्हणून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जे पालक उत्तमरित्या काळजी घेतात, ती मुलं खरोखरच उत्तम संस्कारांनी वाढतात. त्यांच्या वर्तणूकीचा त्रास न होता पूर्ण घराला आनंदच होत राहतो. छोट्या मुलांना काय कळतं या गैरसमजात जी घरे राहतात, त्या घरातल्या मुलांचे भविष्य प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असू शकते. त्या उलट लहान मुलांच्या जडणघडणींचा अभ्यास करून मुलांच सक्षम संगोपन केल्यास त्यांच भविष्य उज्ज्वल ठरेल आणि पालकही भाग्यवंत ठरू शकतील. त्यामुळे बाल संगोपन ही कलासुद्धा महत्त्वाची आहे. मुलांना सर्वच कळत असतं. आपण त्यांच्यासमोर आणि त्यांच्याशी सतत उत्तम वागलं पाहिजे, बोललं पाहिजे याची काळजी घेणारं घर राष्टÑाला तेजस्वी तरुण आणि तरुणी देऊ शकतील. 

Web Title: Art of child rearing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.