थंडीच्या दिवसांतही असाव्यात सुंदर टाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:38 AM2017-12-28T02:38:34+5:302017-12-28T02:38:48+5:30
अनेक वयस्कांमध्ये भेगा गेलेल्या टाचांची समस्या दिसून येते आणि थंडीचा कडाका वाढू लागल्यानंतर काळजी न घेतल्यास, ही समस्या अधिक उग्र रूप घेऊ शकते.
- अमित सारडा
अनेक वयस्कांमध्ये भेगा गेलेल्या टाचांची समस्या दिसून येते आणि थंडीचा कडाका वाढू लागल्यानंतर काळजी न घेतल्यास, ही समस्या अधिक उग्र रूप घेऊ शकते. थंडीच्या दिवसांत त्वचेची आर्द्रता हिरावली जाते आणि ती कोरडी पडते. भेगा पडलेल्या आणि संवेदनशील त्वचा असलेल्यांसाठी ही फारच काळजीची बाब ठरते. काही वेळेस या भेगांमुळे तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात. त्यामुळे टाचेवरची त्वचा कडक होऊ लागली किवा लहान-लहान भेगा दिसून येऊ लागल्या की, लगेचच त्यावर उपाययोजना करणे हाच उत्तम मार्ग आहे.
>काय करावे
आपली पावले स्वच्छ आहेत ना, याची प्रत्येक वेळी काळजी घेणे आणि ते आर्द्र राहतील, याची खबरदारी घेणे. दररोज मॉइश्चरायझरचा वापर करणे योग्य ठरेल. रात्री झोपण्यापूर्वीची वेळ हे मॉइश्चरायझर लावण्याची योग्य वेळ असते. त्या वेळी तुमची पावले अस्वच्छ होत नाहीत आणि हे मॉइश्चरायझर ७ ते ८ तास प्रभावी राहते. तिळाचे तेल आणि लॅव्हेंडर आॅइल यांच्या मिश्रणातून प्रभावी मॉइश्चरायझर घरातही तयार करता येऊ शकेल. अर्धा कप तिळाचे तेल आणि ६ थेंब लॅव्हेंडर आॅइल एका बाटलीत ओतून ती बाटली हलवा. त्यांचे मिश्रण तयार होईल. भेगा पडलेल्या टाचांवर हे मिश्रण एक उत्तम उपाय आहे. झोपण्यापूर्वी दररोज त्याचा वापर केल्यास हळूहळू चांगला परिणाम दिसून येईल.
तिळाच्या बियांपासून तयार केलेले तिळाचे तेल हे त्वचेच्या त्रासांवर एक प्रभावी औषध आहे. त्याचा सुगंधी, पोषक, वेदनाशामक आणि जिवाणूरोधक घटक याने परिपूर्ण असलेल्या या तेलात त्वचेच्या रंध्रांतून त्वचेत खोलवर शोषले जाण्याची क्षमता आहे. यामुळे त्वचेला एक मुलायम पोत प्राप्त होतो आणि त्वचेचे झालेले नुकसान भरून निघते. मसाजसाठीचे तेल म्हणून त्याचा वापर केल्यास, हे त्वचेतील केवळ विषद्रव्येच काढत नाही, तर त्वचेची लवचिकता वाढविते. सोबतच लॅव्हेंडर आॅइल हे वेदनाशामक तेल म्हणून ओळखले जाते, या तेलामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप लागते.
(वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट)