रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाल, व्यायाम करा नाहीतर....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:46 PM2018-09-24T14:46:06+5:302018-09-24T14:47:23+5:30
जे लोक आजारी आहेत, रुग्णालयात आहेत किंवा बेडरेस्ट घेत आहेत अशा लोकांना रक्तात साखरेची पातळी वाढण्याचा अधिक धोका आहे असे यातून सिद्ध झाले आहे. जर मोठ्या काळासाठी लोक जर हालचाल कमी करणार असतील तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करावेच लागेल
ओंटारियो- जे लोक दररोज पुरेशी हालचाल, व्यायाम करत नाहीत त्यांच्या रक्तामधील साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो असे नव्या संशोधनामधून सिद्ध झाले आहे. प्रिडायबेटिस गटातील सामान्य पातळीपेक्षा जास्त वजन असलेल्या लोकांवर हा प्रयोग करण्यात आला.
दिवसाला १००० पावलांपेक्षा जास्त हालचाल न करता २ आठवडे राहिल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. कॅनडामध्ये करण्यात आलेल्या या अभ्यासपाहाणीत धक्कादायक निकाल पाहावयास मिळाले.
दोन आठवड्यांमध्ये या लोकांच्या रक्तामध्ये साखरेची पातळी वाढली होती तसेच दैनंदिन जीवनाप्रमाणे हालचाल करायला सुरुवात केल्यानंतरही काही लोकांना सामान्य स्थितीत येण्यास वेळ गेला. या अभ्यासावरुन एक निबंध जर्नल्स आॅफ जेरेंटोलॉजीमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. आम्हाला वाटत होते हालचाल कमी झाल्यावर या लोकांच्या रक्तशर्करा पातळीत वाढ होईल पण त्यांनी पूर्वीसारखी हालचाल सुरु करण्यात आल्यावरही सामान्य पातळीवर येता आलं नाही हे आमच्यासाठी धक्कादायक होतं असे या शोधनिबंधाचे मुख्य लेखक ख्रिस मॅकग्लोरी यांनी सांगितले. ते ओंटारियोतील हॅमिल्टनमध्ये असणाऱ्या मॅकमास्टर विद्यापिठामध्ये किन्सिओलॉजी विभागामध्ये संशोधन करत आहेत.
जे लोक आजारी आहेत, रुग्णालयात आहेत किंवा बेडरेस्ट घेत आहेत अशा लोकांना रक्तात साखरेची पातळी वाढण्याचा अधिक धोका आहे असे यातून सिद्ध झाले आहे. जर मोठ्या काळासाठी लोक जर हालचाल कमी करणार असतील तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना काहीतरी करावेच लागेल.
अमेरिकेत ८. ४ कोटी लोक सध्या प्रिडायबेटिक स्थितीमध्ये आहेत. अशी माहिती शोधनिबंधाचे सहलेखक स्टुअर्ट फिलिप्स यांनी दिली. प्रिडायबेटिक स्थितीतील लोकांना जर आपले आरोग्य सांभाळायचे असेल आणि भविष्यामध्ये होणारा त्रास कमी करायचा असेल तर योग्य प्रमाणात हालचाल (व्यायाम), आहारात बदल आणि गरज असेल तर औषधांची मदत घेणे योग्य ठरेल असे मॅकग्लोरी यांनी निष्कर्ष काढला आहे. यामुळे प्रौढ व्यक्तींनी दैनंदिन जीवनामध्ये पुरेशी हालचाल व व्यायाम यांना आवर्जून स्थान दिले पाहिजे असे तज्ज्ञ आणि डॉक्टर्स सांगतात.