Gudi Padwa 2018: श्रीखंड किंवा आम्रखंडाव्यतिरिक्त हे स्पेशल पदार्थही तयार करून पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 04:24 PM2018-03-17T16:24:14+5:302018-03-17T20:09:10+5:30
पाडव्याच्या दिवशी जेवणासाठी पक्वान्न काय करायचे हे बऱ्याचदा ठरलेलं असतं. श्रीखंड किंवा आम्रखंड यापलिकडे विचारच होत नाही.
- आदित्य जोशी
मुंबई- पाडव्याच्या दिवशी जेवणासाठी पक्वान्न काय करायचे हे बऱ्याचदा ठरलेलं असतं. श्रीखंड किंवा आम्रखंड यापलिकडे विचारच होत नाही. आता तेही घरी करण्याऐवजी विकत आणलं की आणखी सोपं होतं. परंतु आपले मराठी घरात होणारे अनेक पदार्थ श्रीखंड-आम्रखंडाला पर्याय म्हणून केले जाऊ शकतात. कित्येक पदार्थ विस्मृतीत जात आहेत. तसेच हे पदार्थ बाजारात किंवा हॉटेलमध्ये विकत मिळत नसल्यामुळे ते घरीच करावे लागत असल्यामुळे आणखी मागे पडत गेले. पाडवा किंवा कोणत्याही सणासुदीला करता येतील असे काही पदार्थ आपण यंदा करुन पाहू.
घावन घाटले- कोकणातील एक प्रसिद्ध पदार्थ म्हणून याचं नाव घेतलं जातं. अत्यंत साधी सोपी आणि कमी साधनांमध्ये करता येऊ शकेल असा हा पारंपरिक मराठी पदार्थ आहे. घावन घाटले म्हणजे तांदळाच्या पिठाचे डोसे आणि नारळाचे दुध व गुळ यांचे मिश्रण. यामध्ये तांदळाच्या फक्त पिठाचे आपल्याला हव्या असलेल्या जाडीचे डोसे केले जातात त्याला घावन म्हणतात. घाटले तयार करण्यासाठी नारळाचे दूध आणि गुळ व त्यामध्ये थोडी वेलचीपूड, जायफळपूड घातली जाते. इतका साधा गोड पदार्थ आज मराठी स्वयंपाकघरांमधून नाहीसा होत आहे. वर्षातून पाडवा, दसरा, गणपती अशा सणाच्या निमित्ताने एक-दोनदा तरी आपण हे पदार्थ करु शकाल.
नारळीभात- आजकाल नारळीभात हासुद्धा आपल्या पक्वान्नांमधून नाहीसा होत चालला आहे. अत्यंत साधासोपा आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. नारळी भातासाठी सुवासिक तांदुळ वापरावा. नारळीभातासाठी नारळ. गुळ, तांदुळ आणि लवंग इतकेच साहित्य पुरेसे होते. सर्वप्रथम तांदुळ धुवून घ्यावेत. तेल किंवा तूप गरम करुन त्यात लवंग, वेलची आणि ओले खोबरे हलकेच परतुन घ्यावे. त्यानंतर तांदुळ हलके परतून घ्यावेत. परतत असताना तांदूळ तुटू देऊ नयेत. तांदूळ ज्या प्रमाणात आहेत त्याच्या सव्वा पट गरम पाणी घालून भात शिजवून घ्या. नंतर तांदळाच्या पाऊणपट साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर भात शिजू द्यावा.