तुमच्या घरातल्या पुस्तकांच्या लायब्ररीची कशी काळजी घ्याल?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 04:49 PM2018-08-11T16:49:07+5:302018-08-11T16:51:12+5:30
आपण पुस्तके विकत घेतो किंवा लायब्ररीतून घरी आणतो मात्र ती ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करत नाही. यामुळे पुस्तके हरवणे, फाटणे किंवा कोणीतरी उचलून नेणे असे प्रकार होतात.
मुंबई- असं म्हणतात की तेल, पाणी आणि अपात्र व्यक्तीपासून पुस्तकांना नेहमीच जपलं पाहिजे. हे वाक्य पूर्ण खरे असले तरी पुस्तकांच्या बाबतीत अधिक काळजी करण्याचे अनेक मुद्दे आहेत. आपण पुस्तके विकत घेतो किंवा लायब्ररीतून घरी आणतो मात्र ती ठेवण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था करत नाही. यामुळे पुस्तके हरवणे, फाटणे किंवा कोणीतरी उचलून नेणे असे प्रकार होतात. पुस्तकं योग्य प्रकारे ठेवणे हे आपल्या घरातला एक महत्त्वाचा भाग आहे.
पुस्तकं ठेवावी कशी?
पुस्तकं कशी ठेवली आहेत यावरही तुमचे वाचन अवलंबून असते. पुस्तके आकारानुसार, त्यांच्या विषयानुसार किंवा रंगानुसार ठेवता येतात. लहान मुलांची पुस्तके वेगळी, इतरांनी वाचायची पुस्तके वेगळी. धार्मिक पुस्तके वेगळी असे कप्पे करता येतील. पुस्तकांची काही महिन्यांनंतर जागा बदलणेही वाचनासाठी चांगले असते. त्यामुळे मागे पडलेली किंवा तुमच्या नजरेच्या आड गेलेली पुस्तके समोर येतील आणि त्या पुस्तकांचेही वाचन होईल.
जुन्या पुस्तकांचे काय करावे?
तुमच्याकडे जुनी आणि दुर्मिळ पुस्तके असतील तर ती पुस्तकं वेगळ्या कप्प्यामध्ये काचेच्या आढ ठेवावीत. त्यांच्यावर सूर्यप्रकाश थेट पडणार नाही तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे कसर लागणार नाही, पाणी लागणार नाही याची काळऴजी घ्या. तुमच्या पुस्तकांची जागा ओलसर, कुबट, दमट जागी कधीही असू नये.
धूळ आणि स्वच्छतेचे काय ?
घरामध्ये रद्दी, कागद किंवा पुस्तके असल्यास त्यावर धूळ साठल्याचे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे पुस्तकांची काळजी घेण्यासाठी ही धूळ वेळोवेळी साफ करणं हे तुमचं काम आहे. जर तुम्ही पुस्तकं बेडरुममध्ये ठेवलीत त्यांची काळजी जास्त घ्यावी लागेल. पुस्तके शक्यतो बेडरुममध्ये ठेवू नयेत. ठेवल्यास ती कपाटात बंद ठेवावीत आणि त्यांच्यावरील धूळ वेळोवेळी साफ करावी. अस्थम्याचे रुग्ण घरात असतील तर धूळ साठणार नाही याची जास्त काळजी घ्यावी.